दिवाळीसह रब्बी हंगामाची तयारी; बाजारात सोयाबीनची विक्रमी आवक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 03:38 PM2023-10-26T15:38:38+5:302023-10-26T15:39:35+5:30
दिवसाला ३५ हजार क्विंटलच्या वर आवक : दरात किंचित सुधारणा
नंदकिशाेर नारे
वाशिम : जिल्ह्यात सोयाबीनची काढणी आता जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. दिवाळी आणि रब्बी हंगामाच्या तोंडावर अनेक शेतकरी सोयाबीनची विक्रीही करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनची विक्रमी आवक होत असल्याचे चित्र दिसत आहे. दरातही किंचित सुधारणा झाली असली, तरी अपेक्षेच्या तुलनेत सोयाबीनला कमी दर मिळत असल्याने शेतकरी निराश आहेत.
जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र लक्षणीय आहे. यंदा ३ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात या पिकाची पेरणी झाली आहे. या पिकावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र अवलंबून आहे. आता सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आली असून, दिवाळीचा सणही तोंडावर आला आहे. या सणासह रब्बीची तयारी आणि घेण्यादेण्याचे व्यवहार करण्यासाठी अनेक शेतकरी काढलेले सोयाबीन विकण्यावर भर देत आहेत. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक होत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, रिसोड, मालेगाव आणि मानोरा या सहा प्रमुख बाजार समित्यांसह शेलू बाजार, अनसिंग, शिरपूर येथील उपबाजारात सोयाबीनची विक्रमी आवक आहे.
कारंजात गुरुवारी ९ हजार क्विंटल
शेतकरी दिवाळीचा सण आणि रब्बी हंगामाच्या तयारीसाठी सोयाबीन विकण्यावर भर देत असल्याने बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढत आहे. प्रामुख्याने कारंजा आणि वाशिम बाजार समितीत सोयाबीनची अधिक आवक होत आहे. कारंजा बाजार समितीत गुरुवारी तब्बल ९ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.
दर आणखी वाढण्याची शक्यता
दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनच्या मागणीत वाढ झाली आहे. यामुळे व्यापाऱ्यांचाही सोयाबीन खरेदीवर जोर असल्याने सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा दिसत आहे. सोयाबीनला असलेली मागणी पाहता येत्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांनी वर्तविली आहे.