रिसोड येथे संत अमरदास बाबा संस्थानमध्ये महाप्रसादाची तयारी अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:41 PM2018-02-13T13:41:41+5:302018-02-13T13:43:54+5:30
रिसोड - महाशिवरात्रीनिमित्त येथील संत अमरदास बाबा मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असून, १४ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे.
रिसोड - महाशिवरात्रीनिमित्त येथील संत अमरदास बाबा मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असून, १४ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. दरम्यान, महाप्रसाद बनविण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
रिसोड शहरात संत अमरदास बाबा मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १३ फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. १४ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद वितरण असून, सध्या महाप्रसादाची जय्यत तयारी सुरू आहे. पंचक्रोशीतील महिला या पुरी लाटून देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्या असल्याचे दिसून येते. महाप्रसादासाठी मोफत सेवा दान करण्याची येथील परंपरा अखंडित असून, निजामपूर रिसोड, पवारवाडी या गावातील महिला मोठ्या संख्येने महाप्रसाद बनविण्यासाठी सेवा देतात. येथील महाप्रसाद म्हणून देण्यात येत असलेल्या ‘पूरी’ला विशेष महत्त्व आहे. अनेक भाविक आपल्या अन्न असलेल्या गोदामात ही पूरी साठवून ठेवतात. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने या पुरीचा महाप्रसाद घेण्यासाठी रिसोड शहरात दाखल होत असतात. संत अमरदास बाबा संस्थानच्यावतीने महाप्रसादाचे नियोजन चोख बजावण्यात येते. पूरी ४५ क्विंटल, बुंदी १५ क्विंटल, भाजी २५ क्विंटल असा महाप्रसाद वितरित केला जाणार आहे. जवळपास २१ हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.