जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करण्याची तयारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:35 AM2021-02-08T04:35:36+5:302021-02-08T04:35:36+5:30
कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावी आणि २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग ...
कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावी आणि २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. दुसरीकडे मात्र महाविद्यालये सुरू केव्हा होणार? याकडे विद्यार्थ्यांसह प्राचार्य, प्राध्यापकांचे लक्ष लागून होते. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरुवातीला ५० टक्के उपस्थितीत १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. जिल्ह्यात जवळपास २० महाविद्यालये असून, २२ हजारांवर विद्यार्थीसंख्या आहे. पूर्वतयारी म्हणून वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण, महाविद्यालय परिसराची स्वच्छता आदी कामे केली जात असल्याचे दिसून येते.
०००
प्राध्यापकांची कोरोना चाचणी
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. आता महाविद्यालये सुरू होणार असल्याने प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व प्राचार्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
००
महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात शासन निर्णयानुसार सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. संपूर्ण वर्ग निर्जंतुकीकरण केले तसेच महाविद्यालय परिसरातील साफसफाई करण्यात आली.
- विजयकुमार तुरुकमाने,
प्राचार्य बगडिया महाविद्यालय, रिसोड
०००
महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात पूर्वतयारी करण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
- किशोर वाहाणे,
उपप्राचार्य रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, वाशिम