स्थापनेपूर्वीच द्यावा लागला बाप्पांना निरोप....का ओढावली ही वेळ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 11:44 AM2020-08-23T11:44:49+5:302020-08-23T11:59:58+5:30
स्थापनेपूर्वीच बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करून जड अंतकरणाने निरोप देण्याची वेळ भाविकांवर आली.
लोकमत न्युज नेटवर्क
पोहा: जिल्हाभरात गणरायाच्या स्वागताची धामधूम शनिवारी सुरू असताना कारंजा तालुक्यातील पोहा येथे एका गणेश मंडळानेही स्थापनेसाठी गणेशमूर्ती आणली; परंतु ही मूर्ती स्थापन करण्याची तयारी सुरू असतानाच या मंडळाच्या अध्यक्षाचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे स्थापनेपूर्वीच बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करून जड अंतकरणाने निरोप देण्याची वेळ भाविकांवर आली.
सर्वांचा आवडता आणि मांगल्याचे प्रतिक असलेल्या गणरायाचे शनिवारी कोरोना संसर्ग काळातही उत्साहात स्वागत सुरू होते. या उत्सवादरम्यान कोरोना संसर्गाला थारा मिळू नये म्हणून प्रशासनाने नियम घालून दिले आहेत. पोलीस प्रशासनानेही वाशिम जिल्ह्यात गणेश मंडळांचे समुपदेशन करून एक गाव एक गणपतीची संकल्पना राबविण्याचे आणि गणेश मंडळांची संख्या कमी करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळेच वाशिम जिल्ह्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या निम्म्यावरच आली आहे. त्यात कारंजा तालुक्यातील पोहा येथे पाच गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी केली होती. त्यात एका गणेश मंडळाने गणेश मूर्तीही गावात आणली आणि स्थापनेची तयारी सुरू केली. त्याचवेळी या मंडळाच्या अध्यक्षाचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती ग्रामपंचायत व प्रशासनाला मिळाली. ही बाब आरोग्य विभागाने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे पोलिसांचा ताफा पोहा येथे धडकला. त्यांनी संबंधित परिसर सोडून गावाबाहेर मूर्ती स्थापन करण्याचा सल्लाही मंडळाला दिला; परंतु मंडळाने मूर्ती विसर्जित करण्याची तयारी दर्शविली आणि पोलिसांच्या समक्ष गावातील नदीपात्रा गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
प्रशासनाने केल्या मंडळाच्या रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट
यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान खबरदारी म्हणून जिल्हाप्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सर्वच मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात नोंदणी करणाºया सर्वच गणेश मंडळांच्या अध्यक्ष पदाधिकाºयांची शुक्रवारी रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट घेण्यात आली. त्यात टेस्ट किट संपल्याने पोहा येथील मंडळांची रॅपिड टेस्ट शनिवारी सकाळी करण्यात आली. त्याचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला. त्यातच एका मंडळाच्या अध्यक्षाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व गणेश मंडळ पदाधिकाºयांच्या रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट घेण्यात आल्या. त्यात पोहा येथील एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला. ही माहिती गणेश स्थापनेपूर्वीच त्यांना देण्यात आली. कारंजा पोलिसांनी त्यानंतर त्यांचे समुपदेशन केले.
-धीरज मांजरे,
तहसीलदार, कारंजा.