उमरा (शम.) येथील अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:40 AM2021-04-17T04:40:21+5:302021-04-17T04:40:21+5:30
वाशिम तालुक्यातील उमरा (शम.) येथील अल्पवयीन मुलीचा विवाह ९ एप्रिल २०२१ रोजी होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा महिला व ...
वाशिम तालुक्यातील उमरा (शम.) येथील अल्पवयीन मुलीचा विवाह ९ एप्रिल २०२१ रोजी होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राठोड यांना प्राप्त होताच त्यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी लक्ष्मी एस. काळे, कायदा तथा परीविक्षा अधिकारी जिनसाजी एम. चौधरी, सामाजिक संस्था बाह्य रमेश वाघ, सामाजिक कार्यकर्ता अनंता पी. इंगळे यांना बालविवाह रोखण्याचे आदेश दिले. त्यांनी बालिकेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना बालविवाह रोखण्यासाठी समुपदेशन करून बालविवाहाचे दुष्परिणाम, याविषयीचा कायद्याची माहिती दिली. मुलीच्या कुटुंबियांकडून बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत हमीपत्र लिहून घेतले. तसेच मुलगा व मुलीला त्यांच्या पालकांसोबत बाल कल्याण समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. यावेळी ग्रामसेवक विजय पाटील, गाव बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष, सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविक, पोलीस विभागाच्या श्रीमती पोहेकर, श्री. कोकणे, श्री. देसाई व इतर कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यात अशाप्रकारे बालविवाह होत असल्यास ‘चाईल्ड लाईन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राठोड यांनी केले आहे.