आधीचे ३५ टक्के टार्गेट पूर्ण; आता अठरा वर्षांवरील तीन लाखांवर जणांना मिळणार लस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:41 AM2021-04-21T04:41:17+5:302021-04-21T04:41:17+5:30
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार असून, त्या ...
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार असून, त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातर्फे पूर्वतयारी केली जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार १८ ते ४५ वयोगटातील जवळपास तीन लाखांवर नागरिकांना लस दिली जाणार आहे.
गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. मध्यंतरी कोरोनाचा आलेख खाली आला होता. आता पुन्हा कोरोनाचा आलेख वाढल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. अलीकडच्या काळात कोरोनाचा कहर सुरूच असल्याने जनजीवन प्रभावित होत आहे. दिवसागणिक झपाट्याने वाढत चाललेल्या या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी एकीकडे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले तर दुसरीकडे १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेसही सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत ४५ वर्षावरील नागरिकांना लस दिली जात आहे. आतापर्यंत जवळपास ३५ टक्के नागरिकांना लस देण्यात आली आहे. आता १८ वर्षांवरील नागरिकांदेखील कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात नियोजन केले जात आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाख ९७ हजार १६० आहे. यापैकी अंदाजे ३० टक्के लोकसंख्या ही १८ ते ४५ वर्षे वयोगटातील गृहीत धरण्यात येत असून, त्यानुसार तीन लाखांवर नागरिकांना लस मिळेल, असा अंदाज आरोग्य विभाग बाळगून आहे.
०००००
तीन दिवसाचा साठा
जिल्ह्यात एकूण १३० केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात लसीचा साडेचार हजार डोसचा साठा आहे. यामध्ये दोन ते तीन दिवस लसीकरण मोहीम सुरू राहू शकते.
२२ एप्रिलच्या दरम्यान लसींचा आणखी काही साठा उपलब्ध होण्याचा अंदाज असून, उपलब्ध लसीनुसार लसीकरण करण्यात येत आहे. मागणीच्या तुलनेत लसींचा कमी पुरवठा होत आहे.
०००
४५ पेक्षा जास्त वयाचे ३५ टक्के लसीकरण
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी व अन्य कर्मचारी, अधिकाऱ्यांना लस देण्यात येत आहे.
आतापर्यंत ४५ पेक्षा जास्त वयाच्या जवळपास ३५ टक्के नागरिकांना लस देण्यात आली आहे. उपलब्ध लसीनुसार लसीकरण सुरू आहे.
००००
उपलब्ध लसीनुसार लसीकरण
कोरोना प्रतिबंधक लसीला जिल्ह्यात १६ जानेवारीपासून प्रारंभ झाला. एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात लसीकरण केंद्र वाढविण्यात आली आहेत. १३० केंद्रांमध्ये लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत १ लाख २३ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये १० हजार नागरिकांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे. पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी लसीचा दुसरा डोस देण्यात येतो. गत १५ दिवसांपासून मागणीनुसार लसीचा पुरवठा होत नसल्याने अधूनमधून लसीकरण मोहीम प्रभावित होत आहे. उपलब्ध लसीनुसार लसीचा पहिला डोस देण्याला प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. आतापर्यंत केवळ १० हजार जणांना लसीचा दुसरा डोस मिळाला.
०००००
लसीकरण केंद्र वाढविण्यावर चर्चा
जिल्ह्यात सध्या १३० केंद्रांमध्ये लसीकरण केले जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र यासह खासगी दवाखान्यांमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध केली आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांनादेखील लस देण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्र वाढवायचे किंवा आहे तेवढेच ठेवायचे याचा निर्णय आगामी बैठकीत होणार आहे. अद्याप लसीकरण केंद्र वाढविण्यावर कोणताही निर्णय किंवा चर्चा झाली नाही.
०००
ज्येष्ठ सर्वात पुढे
आतापर्यंत हेल्थ केअर वर्कर्स यांची लसीकरणाची टक्केवारी ७७ अशी आहे. फ्रंट लाईन वर्कर्स यांची टक्केवारी ९१ तर ज्येष्ठांची टक्केवारी ८५ पेक्षा अधिक आहे.
४५ वर्षावरील एक लाख अडीच हजार जणांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. लस घेण्याला ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.