कारंजातील बाजारात बैलजोडीचे दर दीड लाखांच्या वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 12:55 PM2021-02-17T12:55:17+5:302021-02-17T12:55:45+5:30

Washim News कारंजातील गुरांच्या बाजारात दमदार बैलजोडीचे दर दीड लाखांच्या वर पोहोचले आहेत.

The price of a pair of oxen in the fountain market is over one and a half lakh | कारंजातील बाजारात बैलजोडीचे दर दीड लाखांच्या वर

कारंजातील बाजारात बैलजोडीचे दर दीड लाखांच्या वर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गेल्या काही वर्षांपासून यांत्रिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने गाेवंशीय जनावरांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे बैलांना सोन्याचा भाव मिळत असून, कारंजातील गुरांच्या बाजारात दमदार बैलजोडीचे दर दीड लाखांच्या वर पोहोचले आहेत.
शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरल्याने गुरांची संख्या घटली आहे. प्रामुख्याने बैलांचा खर्च शेतकऱ्यांना परवडत नसल्याने आता बैलांची संख्या घटली आहे. त्यामुळेच बाजारात बैलांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. 
वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा मानल्या जाणाऱ्या कारंजा येथील बाजारात सोमवारी दमदार बैलजोडीला दीड लाखांच्या वरच दर मिळत असल्याचे दिसून आले.  
कारंजा येथील गुरांच्या बाजारात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नजीकच्या अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरीही गुरांच्या खरेदीसाठी येतात. त्यामुळे या बाजारात दर सोमवारी लाखोंची उलाढाला केवळ बैलांच्या खरेदी-विक्रीतूनच होत आहे. सोमवारी भरलेल्या गुरांच्या बाजारात एक लाख ४० हजार रुपयांना बैलजोडी विकल्या गेली.

२० लाखांची उलाढाल
कारंजा येथील गुरांच्या बाजारात वाशिम जिल्ह्यासह अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी गुरांच्या खरेदीसाठी येत असतात. या ठिकाणी गाय, बैल, म्हैस यांच्यासह शेळ्यांची सर्वाधिक खरेदी-विक्री होते. यातून दर आठवड्याला २० लाखांच्यावर उलाढाल होत असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. त्यात बैलांसह म्हशीच्या किमती अधिक असल्याने प्रामुख्याने या दोन वर्गातील गुरांच्या खरेदी-विक्रीतूनच अधिक उलाढाल होत आहे. 

बैलजोडीवर दिवसाला १५० रुपये खर्च
आधीच चाऱ्याचे दर वाढले असताना बैलांच्या देखभालीसाठी ठेवल्या जाणाऱ्या गड्याची मजुरीही वाढली आहे. त्यामुळे एका बैलजोडीसाठी कडबा, कुटार आणि गड्याच्या मजुरीसह इतर खर्च मिळून शेतकऱ्यांना दीडशे रुपये खर्च येत आहे.


गेल्या काही वर्षांपासून चाऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. कडबा मिळणे दुरापास्त असून, कुटाराचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बैलांसाठी पुरेसा चारा असणे आवश्यक आहे. त्यामुळे एकंदर गुरे पाळणे ही समस्याच झाली आहे.    

 - तुषार भिंगारे, शेतकरी, जानोरी,

 

चाऱ्याचा मोठ्या प्रमाणात असलेला तुटवडा, तसेच गुरांची देखभाल करण्यासाठी द्यावा लागणारा वेळ, या गोष्टी अडचणीच्या ठरत आहेत. वातावरणातील बदलामुळे वाढत असलेल्या आजारांमुळे गुरे पाळणे आता कठीण होऊन बसले आहे.

-अविनाश भिंगारे, शेतकरी, जानोरी


पूर्वी गुरांचा गोठा नाही, असा शेतकरी मिळणे कठीण होते; परंतु गुरांच्या चाऱ्यासह विविध गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. भाकड जनावरांची समस्याही आता गंभीर झाल्याने गुरे पाळण्याचा विचारही करणे अशक्य आहे.
- सुधाकर इंगळे, शेतकरी, इंझोरी 

Web Title: The price of a pair of oxen in the fountain market is over one and a half lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.