प्राथमिक शिक्षकांना पदोन्नतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:37 AM2021-07-26T04:37:30+5:302021-07-26T04:37:30+5:30
वाशिम : जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया अद्याप निकाली निघाली नसल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमट आहे. बिंदुनामावलीतील त्रुटीची ...
वाशिम : जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया अद्याप निकाली निघाली नसल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमट आहे. बिंदुनामावलीतील त्रुटीची पूर्तता करून पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी अ.भा. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विजय मनवर यांच्यासह शिक्षक संघटनांनी केली.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७८ प्राथमिक शाळा असून, या शाळेवर तीन हजारांपेक्षा अधिक शिक्षक कार्यरत आहेत. ज्येष्ठ शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यासाठी गत दोन वर्षांपासून प्रशासकीय कार्यवाही केली जात आहे.
बिंदुनामावली पूर्ण झाल्यानंतर जवळपास ७४ शिक्षक हे मु्ख्याध्यापकाच्या पदोन्नतीसाठी पात्र ठरलेले आहेत. आज ना उद्या पदोन्नती मिळेल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या या शिक्षकांच्या पदरी निराशाच पडत आहे. सध्या जिल्हा परिषदेतील इतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न निकाली काढण्यात आला. तेव्हा शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्नच प्रलंबित का, प्रश्न शिक्षक संघटनांमधून उपस्थित केला जात आहे.
०००००००
बिंदुनामावली प्रस्तावात त्रुटी
शिक्षण विभागाने बिंदुनामावलीचा प्रस्ताव अमरावती येथील समाजकल्याणच्या विभागीय कार्यालयाकडे पाठविल्यानंतर यामध्ये त्रुटी काढण्यात आल्या. त्रुटींची पूर्तता झाली नसल्याने पदोन्नती प्रक्रियादेखील रखडली असल्याचे सांगण्यात येत आहे. ७४ शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती केव्हा मिळणार, याकडे शिक्षकांचे लक्ष लागून आहे.
००००
मुख्याध्यापकांची ७० पदे रिक्त
जिल्ह्यात मुख्याध्यापकांची ७०पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. दुसरीकडे पदोन्नती नसल्याने मुख्याध्यापक पदाचा प्रभार इतरांकडे सोपविण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. पदोन्नतीप्रक्रिया पूर्ण करून मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी होत आहे.