प्रधानमंत्री किसान सन्मान योजना; मंगरुळपीर तालुक्यातील १७ हजार शेतकरी लाभाच्या प्रतिक्षेतच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 02:15 PM2019-07-13T14:15:47+5:302019-07-13T14:16:06+5:30
तालुक्यातील जवळपास २५ हजार शेतकरी पात्र असतांना केवळ साडेसात हजार कास्तकारांनाच प्रत्यक्ष योजनेचा लाभ मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनअंतर्गत तालुक्यातील जवळपास २५ हजार शेतकरी पात्र असतांना केवळ साडेसात हजार कास्तकारांनाच प्रत्यक्ष योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरीत जवळपास १७ हजार कास्तकार योजनेच्या लाभाच्या प्रतिक्षेत असुन सर्व कास्तकारांना तातडीने लाभ मिळावा अशी मागणी पं.स. सदस्या रफीका बानो युनूस खान व सामाजिक कार्यकर्ते युनूस खान यांनी केंद्रीय कृषि मंत्र्यांना निवदेनाद्वारे केली आहे.
मंगरूळपीर तालुक्यातील २ हेक्टर किंवा त्यापेक्षाकमी जमीन असलेले १४२०० शेतकरी तर २ हेक्टरपेक्षा अधिक जमीन असलेले ६९०० जवळपास २१०० कास्तकार योजनेस पात्र आहेत. तर सामाईक क्षेत्रातील शेती कसणारे ४५०० शेतकरीसुध्दा या योजनेसाठी पात्र ठरल्याचे कळते. अशाप्रकारे मंगरूळपीर तालुक्यातील जवळपास २५ते ३० हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र असल्याचे कळते. असे असतांना आतापर्यन्त केवळ साडेसात हजार शेतक-यांच प्रत्यक्ष या योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरीत कास्तकार अजुनही योजनेच्या लाभाची वाट पाहत आहेत. जुलै महिन्यात पुरेसा पाउस नसल्याने शेतकरी अडचणीत आला असुन किटकनाशके व रासायनीक खतांचा वाढता खर्च पाहता पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हातभार लागेल अशी अपेक्षा असतांना ती फोल ठरली आहे. मंगरूळपीर तालुक्यातील कास्तकारांचे हाल पाहता तालुक्यातील शेतक-यांना जुलै महिना संपण्यापूर्वी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा तातडीने लाभ देण्याची मागणी पं.स. सदस्या सौ.रफीका बानो युनूस खान व सामाजिक कार्यकर्ते युनूस खान यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातुन केली आहे.