‘प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन’ : लाभार्थी माहिती संकलनाचा आज शेवटचा दिवस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 03:05 PM2018-05-09T15:05:16+5:302018-05-09T15:05:16+5:30
वाशिम : प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशनअंतर्गत ३० एप्रिल रोजीच्या ग्रामसभेस अनुपस्थित राहिलेल्या कुटुंबाची माहिती संकलीत करण्याची मुदत १० मे असून, पात्र लाभार्थींनी विहित मुदतीत माहिती देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.
वाशिम : प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशनअंतर्गत ३० एप्रिल रोजीच्या ग्रामसभेस अनुपस्थित राहिलेल्या कुटुंबाची माहिती संकलीत करण्याची मुदत १० मे असून, पात्र लाभार्थींनी विहित मुदतीत माहिती देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.
केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन’ योजने अंतर्गत पात्र लाभार्थी कुटूंबाला प्रतिवर्षी ५ लाख रुपये आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. देशभरात कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात विनामूल्य शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलन मोहिम २१ मे २०१८ पर्यंत राबविली जात आहे.
कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये म्हणून वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्यांची काही अतिरिक्त माहिती जमा केली जात आहे. ग्राम स्वराज्य अभियानादरम्यान लाभार्थी पडताळणी, अतिरिक्त माहिती संकलित करण्याची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. ग्रामसेवक, एएनएम आणि आशा आदींच्या माध्यमातून २१ मे पर्यंत लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलन मोहीम राबविली जाणार आहे. लाभार्थ्याचा मोबाईल, क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक, कुटंबाच्या सद्यस्थितीमधील बदल आदी माहिती घेतली जात आहे. ३० एप्रिल रोजी ग्रामसभेमध्ये याद्यांचे वाचन करुन अतिरिक्त माहिती संकलन केली होती. या ग्रामसभेमध्ये अनुपस्थित राहिलेल्या कुटंूबाची माहिती आशा, आरोग्य सेविकेव्दारे गृहभेटी देवून १ मे ते १० मे २०१८ या कालावधीत संकलित केली जात आहे. २१ मे पर्यत लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलित केली जाणार आहे. संकलित केलेली माहिती १० मे ते २१ मे या कालावधीमध्ये संकेतस्थळावर अपलोड केली जाणार आहे. अधिकाधिक कुटूंबांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर तसेच पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी केले आहे.