आढावा बैठकीस प्राचार्य अनुपस्थित; २४ महाविद्यालयांना ‘शो-काॅज’!

By सुनील काकडे | Published: July 10, 2024 03:54 PM2024-07-10T15:54:08+5:302024-07-10T15:54:24+5:30

खुलासा सादर करण्याचे निर्देश : तीन दिवसांचा ‘अल्टीमेटम’

Principal absent from review meeting; 24 colleges show case | आढावा बैठकीस प्राचार्य अनुपस्थित; २४ महाविद्यालयांना ‘शो-काॅज’!

आढावा बैठकीस प्राचार्य अनुपस्थित; २४ महाविद्यालयांना ‘शो-काॅज’!

सुनील काकडे, वाशिम : जिल्ह्यातील महाविद्यालयांनी इयत्ता ११वीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश करू नये. तसेच ११वी नंतर अन्य महाविद्यालयांतील कुठल्याच विद्यार्थ्यांस इयत्ता १२वीत परस्पर प्रवेश देवू नये, अशी स्पष्ट सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी ९ जुलै रोजी बैठक घेण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील २४ विद्यालयांतील मुख्याध्यापक, प्राचार्य अनुपस्थित राहिले. त्यांच्या नावे त्याचक्षणी कारणे दाखवा नोटीस काढून तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी शहरी भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ११वीत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी १२वीसाठी ग्रामिण भागातील महाविद्यालयांकडे धाव घेत आहेत. हा प्रकार चुकीचा असून त्यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने यापुढे जिल्ह्यातील कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षणाधिकारी कार्यालयाची रितसर पुर्वपरवानगी घेतल्याशिवाय परस्पर प्रवेश देवू नये. विद्यार्थ्याच्या मूळ कनिष्ठ महाविद्यालयास इयत्ता ११वी उत्तीर्ण झाल्याचा दाखला देण्याकरिता पत्र देवू नये. पूर्वपरवानगीशिवाय १२वीत परस्पर प्रवेश दिल्यास असे प्रवेश रद्द करण्यात येतील, असे स्पष्ट निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते.
दरम्यान, ६ जुलै रोजी इयत्ता ११वीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. तोपर्यंत झालेले प्रवेश आणि इयत्ता १२वीत नव्याने झालेल्या प्रवेशाचा आढावा घेण्याकरिता ९ जुलै रोजी बैठक घेण्यात आली. मात्र, २४ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य अनुपस्थित राहिले. यामुळे संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
 
काय नमूद आहे नोटीसमध्ये?
इयत्ता ११वी आणि १२वीच्या प्रवेशासंबंधीचा आढावा घेण्याकरिता ९ जुलै रोजी आयोजित बैठकीसंबंधी वेळोवेळी कळवूनही मुख्याध्यापक, प्राचार्य अनुपस्थित राहिले. वरिष्ठांची सूचना आणि शासकीय धोरणांचे पालन न केल्याप्रकरणी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता काढून घेण्याची कार्यवाही का करण्यात येवू नये, असे नोटीसमध्ये नमूद आहे. तीन दिवसांत समाधानकारक खुलासा सादर न केल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे यांनी नोटीसद्वारे संबंधितांना कळविले आहे.

Web Title: Principal absent from review meeting; 24 colleges show case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम