कृषि क्षेत्राच्या विकासाला शासनाचे प्राधान्य - पालकमंत्री संजय राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 04:00 PM2019-08-16T16:00:20+5:302019-08-16T16:02:04+5:30
वाशिम : कृषि क्षेत्राच्या विकासाला शासनाने प्राधान्य दिले असून, शेती आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी १५ आॅगस्ट रोजी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कृषि क्षेत्राच्या विकासाला शासनाने प्राधान्य दिले असून, शेती आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी १५ आॅगस्ट रोजी केले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्यासह अधिकारी, मान्यवरांची उपस्थिती होती. पालकमंत्री राठोड म्हणाले, संरक्षित सिंचनाच्या सोयी वाढविण्यासाठी राज्य शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे यासारख्या योजना राबविल्या जात आहेत. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात जलसंधारणाची ११ हजार ३६१ कामे पूर्ण झाली आहेत. विविध प्रकल्पातून ३१ लाख ६ हजार ६३६ घनमीटर गाळ उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे ७६ हजार ५७५ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील ३५ सिंचन प्रकल्प भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेले आहेत. त्यामधून २३ हजार ५५० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. सन २०१५ पासून जिल्ह्यात ५ हजार ७३९ हेक्टर सिंचन विहिरींची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे शेतीला संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे.
नोव्हेंबर २०१४ पासून आतापर्यंत २१ हजार ४३० शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या अंतर्गत ३६ कोटी १६ लाख रुपये निधी देण्यात आला. त्यामुळे १५ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचनाची सोय उपलब्ध झाली असल्याचे पालकमंत्री राठोड यावेळी म्हणाले. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाºया अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती यांचा यावेळी पालकमंत्री राठोड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच स्वातंत्र सैनिक जनार्धन खेडकर, शंकुतलाबाई अवगडे यांचे पालकमंत्र्यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात महापुरामुळे मोठी हानी झाली आहे. त्याचा फटका हजारो कुटुंबांना बसला आहे. या पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहून जिल्हावासीयांनी त्यांना आधार द्यावा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून अथवा वस्तू स्वरुपात मदत पाठवून पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन पालकमंत्री राठोड यांनी यावेळी केले.