पाणीटंचाई निवारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:18 AM2021-05-04T04:18:28+5:302021-05-04T04:18:28+5:30
वाशिम : जिल्ह्यातील काही गावांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. संबंधित गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी ...
वाशिम : जिल्ह्यातील काही गावांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. संबंधित गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी जवळपास असलेल्या जलस्त्रोतावरुन पाणीपुरवठा करण्यात यावा. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीटंचाई निवारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात ३० एप्रिल रोजी जिल्हा पाणीटंचाई आढावा बैठक पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री देसाई म्हणाले, पाणी टंचाई निवारणाची तातडीची उपाययोजना म्हणून गावाजवळ असलेल्या जलस्त्रोतावरून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात यावा. पाण्याचे स्त्रोत आटले तर ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची आहे. लोकप्रतिनिधींना व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पाणीटंचाईसाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येईल, यावर चर्चा करून निर्णय घ्यावा. ज्या नळयोजना नादुरुस्त आहे, त्या तातडीने दुरुस्त कराव्यात. स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची देखील तातडीने दुरुस्ती करून ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या काळात पाणीपुरवठा त्वरित उपलब्ध करून देण्याचे काम संबंधित विभागाने करावे. ज्या उद्भव विहिरीमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे, तेथून टंचाईग्रस्त गावांना पाणी मिळाले पाहिजे याचे नियोजन करावे, असेही देसाई यांनी सांगितले
१ मे ते १० जून या कालावधीत निर्माण होणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन टंचाई निवारणाची कामे प्राधान्याने करावी. पाणीपुरवठा योजनांच्या आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात. ज्या ठिकाणावरून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, त्या जलस्त्रोतात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याची खात्री करावी. त्यानंतरच तेथून पाणीपुरवठा करावा. पैशाचा योग्य प्रकारे विनियोग करून पाणीटंचाईवर मात करण्याच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, असेही देसाई यांनी सांगितले.
००
सात विहिरींचे अधिग्रहण
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणार्थ ३९२ गावांकरिता ४२२ विविध उपाययोजनांकरिता पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आला होता. यावर्षी आजपर्यंत सात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून वाशिम तालुक्यातील पाच आणि मानोरा तालुक्यातील दोन विहिरींचा समावेश आहे, तर दोन टँकरचे प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती साळुंके यांनी दिली.