खासगी कंपनीच्या सोयाबीन बियाण्याच्या १५६७ बॅग विक्री बंदचे आदेश !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 03:28 PM2018-05-18T15:28:50+5:302018-05-18T15:28:50+5:30
एका खासगी कंपनीच्या सोयाबीन बियाणाच्या १५६७ बॅगला विक्री बंदचे आदेश देण्यात आले.
वाशिम : शेतकºयांची फसगत होऊ नये म्हणून कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहिम हाती घेतली असून, अनसिंग येथे बुधवारी केलेल्या पाहणीत अनियमितता व अप्रमाणित बियाणे आढळून आले. एका खासगी कंपनीच्या सोयाबीन बियाणाच्या १५६७ बॅगला विक्री बंदचे आदेश देण्यात आले.
आगामी खरीप हंगामात शेतकºयांना गैरसोयीचा सामना करण्याची वेळ येऊ नये, खते व बियाण्यांसंदर्भात फसगत होऊ नये म्हणून कृषी विभागाने दक्षता बाळगावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्या अनुषंगाने कृषी सेवा केंद्रांच्या संचालकांना वाशिम जिल्हयात एका कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण देण्यात आले. बोगस बियाणे आढळल्यास किंवा बोगस बियाण्यासंदर्भात कृषी विभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहनही केले होते. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या चमूतर्फे कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहिम हाती घेतली असून, अनसिंग येथे पाहणी केली असता शासकीय नियमांची पुर्तता झाली नसल्याचे निदर्शनात आले. खाजगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्याचे १५६७ बॅगला विक्री बंद आदेश देण्यात आले. तपासणीसाठी नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी वाशिम तालुका कृषी अधिकारी रमेश भद्रोड यांची उपस्थिती होती.