रूग्णसेवेसाठी खासगी डॉक्टर कटिबद्ध - डॉ. अमित गंडागुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 04:45 PM2020-09-05T16:45:51+5:302020-09-05T16:46:07+5:30
‘आयएमए’चे जिल्हा सचिव डॉ. अमित गंडागुळे यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. भविष्यात आवश्यकता भासल्यास जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांची सेवा ‘कॉल आॅन’ स्वरुपात उपलब्ध करून घेण्याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पदाधिकाºयांशी चर्चा करावी, अशा सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी दिल्या. त्याअनुषंगाने ‘आयएमए’ची पुढील दिशा, कॉल आॅन स्वरुपात सेवा देणार का आदीबाबत ‘आयएमए’चे जिल्हा सचिव डॉ. अमित गंडागुळे यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...
कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात काय सांगाल?
सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य क्षेत्रातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. बाजारपेठेतील अनावश्यक गर्दी टाळावी, रुग्णालयात येताना रुग्णांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, शक्यतोवर ‘अपॉइनमेंट’ घेऊनच यावे. डॉक्टरांनीदेखील आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
आरोग्य विभागाने ‘कॉल आॅन’ स्वरुपात खासगी डॉक्टरांना बोलाविले तर याला संघटनेचा पाठिंबा राहिल का?
रुग्णसेवेसाठी खासगी डॉक्टर कटिबद्ध आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अनेकांना कोरोनाची लक्षणे आढळून येत नाहीत. त्यामुळे पुणे, मुंबई आदी ठिकाणी ‘होम आयसोलेशन’ची जी सुविधा उपलब्ध करून दिली, ती सुविधा वाशिममध्ये उपलब्ध करावी. काही त्रास नसेल, लक्षणे नसतील आणि घरी सुविधा उपलब्ध असेल तर ‘होम आयसोलेशन’चा पर्याय द्यावा. त्यामुळे सरकारी व खासगी रुग्णालयांतील रुग्णसंख्याही कमी होईल. कठीण काळात आरोग्य विभागाने खासगी डॉक्टरांना बोलाविले तर संघटनेचा पाठिंबा राहिल.
कोरोनासंदर्भात कोणती दक्षता घ्यावी?
मास्क लावणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे, सर्दी, ताप, खोकला असेल तर तातडीने तपासणी करून घ्यावी.
जिल्ह्यातील आरोग्य सुविधेसंदर्भात काय सांगाल?
अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत आणि लोकसंख्येच्या तुलनेत जिल्ह्यात सरकारी रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. उपलब्ध मनुष्यबळ आणि सुविधांनुसार रुग्णांना सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आरोग्य विभागाकडून होत आहे. ज्यांना कोणतीच लक्षणे नाही व त्रास नाही, त्यांना घरातच अलगीकरण म्हणून राहण्याचा पर्याय द्यायला हवा.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारावर गेली आहे. नागरिकांचा कोरोनाबाधित रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत असल्याचे दिसून ेयेते. विशेषत: ग्रामीण भागात हा प्रकार जास्त आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना जणू वाळीत टाकल्यासारखे प्रकारही ग्रामीण भागात काही ठिकाणी होतात. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून त्यांना मानसिक आधार देण्याची गरज आहे.