खासगी माध्यमिक शिक्षकांचे वेतन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:41 AM2021-03-26T04:41:30+5:302021-03-26T04:41:30+5:30
शिक्षकांना वेळेत वेतन अदा करण्याचे आदेश शासनस्तरावरून सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत. त्याची अमलबजावणी मात्र अद्यापही योग्यरित्या होत नाही. ...
शिक्षकांना वेळेत वेतन अदा करण्याचे आदेश शासनस्तरावरून सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत. त्याची अमलबजावणी मात्र अद्यापही योग्यरित्या होत नाही. वेळोवेळी विविध तांत्रिक कारणामुळे शिक्षकांचे वेतन रखडून त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. वाशिम जिल्ह्यातील शिक्षकांनाही या समस्येचा सामना अनेकदा करावा लागला आहे. वेतन रखडल्याने कर्जाचे हफ्ते रखडने, आर्थिक व्यवहार खोळंबणे, कौटुंबिक आणि सामाजिक दायित्व पार पाडण्यात त्यांना अडचणी येतात. अशात फेब्रुवारी महिन्यातील माध्यमिक शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्यातील वेतनही रखडल्याने त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात ३०९ माध्यमिक शाळा असून, त्यामध्ये ४१८५ शिक्षक कार्यरत आहेत. त्यात ९ ते १२ वीपर्यंतचे २५८१ आणि ५ वी ते आठवीपर्यंतच्या १६३४ शिक्षकांचा समावेश आहे.
---------------------
वेतनासाठी अनुदानाचा तिढा
शिक्षकांचे वेतन वेळेत अदा करण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधीची गरज असते. शासनस्तरावरून वेळेत निधी प्राप्त झाल्यानंतर शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निकाली काढणे शक्य होते; परंतु फेबु्रवारी महिन्याचे वेतन माध्यमिक शिक्षकांना अदा करण्यासाठी शासनस्तरावरून पुरेसा निधीच प्राप्त झाला नाही. जिल्ह्यातील केव्ळ ३४ शाळांसाठी जि.प.ला निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचे वतन अद्यापही शिक्षकांना अदा होऊ शकले नाही.
------------------
कोट: कोरोना संसर्गामुळे आधीच शिक्षकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. व्यवहारांवर मर्यादा आल्या आहेत. त्यात फेब्रुवारी महिन्याचे वेतन अद्यापही मिळाले नाही. होळीचा सण तोंडावर असताना वेतन रखडल्याने सण साजरा कसा करावा, आर्थिक व्यवहार, देणी घेणी कशी करावी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
- संदीप देशमुख,
जिल्हाध्यक्ष शिक्षक महासंघ वाशिम
----------
कोट: शासनस्तरावरून वेतन अदा करण्यासाठी शासनस्तरावरून पुरेसा निधी प्राप्त झाला नाही. केवळ ३४ शाळांसाठी निधी प्राप्त झाला आहे. तथापी, या संदर्भात वेतन पथक अधीक्षकांशी चर्चा करून आणखी काही अडचणी आहेत का, माहित करून शिक्षकांच्या वेतनाचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.
-रमेश तांगडे,
शिक्षणाधिकारी, माध्यमिक,
-------------
जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा -३०९
एकूण शिक्षक -४१८५
९ ते १२ वीचे शिक्षक -२५५१
५ वी ते ८ वीचे शिक्षक -१६३४