खासगी वाहतूकदारांचा व्यवसाय ‘लॉकडाउन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 11:08 AM2020-05-24T11:08:38+5:302020-05-24T11:08:48+5:30
विविध प्रकारच्या खासगी वाहनांवर काढलेले कर्ज कसे फेडावे, याची चिंता वाहनमालकांना लागली आहे.
- शंकर वाघ
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : लॉकडाउन व संचारबंदीच्या काळात २४ मार्चपासून ते आजतागायत खासगी वाहतूक बंद असल्याने खासगी वाहतूकदारांना जबर फटका बसला आहे. विविध प्रकारच्या खासगी वाहनांवर काढलेले कर्ज कसे फेडावे, याची चिंता वाहनमालकांना लागली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून २४ मार्चपासून लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. ३१ मे पर्यंत संचारबंदी व लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. लॉकडाउनमध्ये अनेक उद्योग, धंदे यासह लघु व्यावसाय बंद असल्याने याचा आर्थिक फटका व्यावसायिकांना बसला. २० एप्रिलनंतर जिल्ह्यात कृषीविषयक क्षेत्र तसेच ४ मे पासून अनेक व्यवसायांना मुभा मिळाली आहे. परंतू, खासगी प्रवासी वाहतूक बंद असल्याने याचा फटका खासगी वाहनधारकांना बसत आहे. प्रवासी वाहतूक करणारे आॅटो, काळीपिवळी, लक्झरी आदी खासगी बसचालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
आॅटोद्वारे प्रवासी वाहतूक करून अनेक युवक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशाच प्रकारे काळीपिवळी, प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेसचे मालक-चालकही प्रवासी व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खासगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. अद्यापही खासगी प्रवासी वाहतूक सुरू नसल्यामुळे वाहनांवर काढलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, याची चिंता वाहनमालकांना लागली आहे.
भरपाईची मागणी
कोरोनामुळे २४ मार्चपासून देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला. त्याची अंमलबजावणीही सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका आॅटो, काळीपिवळी, खासगी बस चालक मालकांना बसत आहे. आॅटो, काळीपिवळी व खाजगी लक्झरी मालक, चालक, वाहकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून खासगी प्रवासी वाहतुकदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रकाश बळी यांच्यासह अनेकांनी केली.