बॅरेजेसचे पाणी एकबुर्जीत आणण्यात अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:45 PM2017-10-14T14:45:30+5:302017-10-14T14:45:51+5:30
वाशिम: यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे एकबूर्जी धरणात जलसाठा वाढला नाही. ही बाब लक्षात घेऊन शहराच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून कोकलगावसह इतर बॅरेजेसमधील पाणी एकबूर्जीत आणण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु या निर्णयाला संबंधित गावच्या ग्रामस्थांनी विरोध केला असून, याबाबतचा सर्व्हे थांबवला नाही, तर उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे.
यंदा अल्प पावसामुळे एकबूर्जी धरणात अतिशय कमी जलसाठा उरला असून, या धरणावर अवलंबून असलेल्या वाशिमक रांना उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भिती आहे. या पृष्ठभूमीवर लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करून वाशिम शहरातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी तालुक्यातील बॅरेजेसमध्ये उपलब्ध असलेले पाणी एकबुर्जीत आणण्यासाठी मंजुरी देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून या कामी सर्व्हेही करण्यात येत आहे; परंतु या निर्णयाला कोकलगाव, वरूड. गणेशपुर, जुमडा आदि गावांतील लोकांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर करून सर्व्हे थांबविण्याची मागणी केली आहे. याची दखल न घेतल्यास आमरण उपोषण करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. वाशिमची पाणी समस्या सोडविण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करावा, असेही ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.