संघर्ष समितीच्या माध्यमातून सोडविणार शिक्षकांच्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:15 AM2021-08-02T04:15:13+5:302021-08-02T04:15:13+5:30
वाशिम : मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या सामूहिक अडचणींवर चर्चा करून जिल्ह्यातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन समस्या सोडवण्यासाठी ...
वाशिम : मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या सामूहिक अडचणींवर चर्चा करून जिल्ह्यातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन समस्या सोडवण्यासाठी संघर्ष समिती शु्क्रवारी तयार केली. सर्वानुमते समिती अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्रा. बाळासाहेब गोटे यांची निवड केली.
जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक सभेचे आयोजन विश्रामगृहात शुक्रवारी करण्यात आले होते. सभेमध्ये मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सामूहिक अडचणींवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व संघटनांनी वज्रमूठ बांधून शासन व प्रशासन स्तरावर सोबत राहून समस्या सोडवण्याचा निर्धार केला. संघर्ष समिती तयार करून अध्यक्ष म्हणून प्रा. बाळासाहेब गोटे यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून सोनाजी इंगळे, उपाध्यक्षपदी संदीप देशमुख, महेश उगले, सचिवपदी प्रा. रमेश आरू, प्रशांत कव्हर, सहसचिवपदी प्रवीण कदम, गजानन कोरडे, प्रा. दिलीप आंबेकर, तर उर्दू विभाग समन्वयक म्हणून तनवीर पठाण व प्रसिद्धिप्रमुख म्हणून हरीश चौधरी यांची निवड करण्यात आली. १३ सदस्य, ८ मार्गदर्शक यांच्या नावांची घोषणाही करण्यात आली. सभेला जिल्ह्यातील शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. सभेचे संचालन प्रा. संतोष गिऱ्हे यांनी, तर आभार सोनाजी इंगळे यांनी मानले.
०००००
प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यावर भर
पदोन्नती, दरमहा नियमित वेतन, जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शाळेचा प्रश्न यासह मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सर्वांच्या सहकार्यातून व प्रयत्नातून प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यावर भर राहील, असे यावेळी ठरविण्यात आले.