पोषण आहार विक्री प्रकरणी कारवाई गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 06:15 PM2019-09-07T18:15:47+5:302019-09-07T18:15:52+5:30
गटशिक्षणाधिकाºयांनी चौकशीही केली; परंतु आता १८ दिवस उलटले तरी या प्रकरणी कारवाई गुलदस्त्यातच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहरी (वाशिम) : मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी येथील जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहाराचे धान्य मुख्याध्यापक आणि शाळा समिती उपाध्यक्षांनी संगनमत करून विकले, अशी तक्रार मोहरी येथील पालकवर्ग व गावकºयांनी गटशिक्षणाधिकारी मंगरुळपीर, जि.प. शिक्षणाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे २१ आॅगस्ट रोजी केली होती. या प्रकरणी गटशिक्षणाधिकाºयांनी चौकशीही केली; परंतु आता १८ दिवस उलटले तरी या प्रकरणी कारवाई गुलदस्त्यातच आहे.
मोहरी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथ्या वर्गापर्यंतची शाळा असून, या शाळेत ६२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत मुख्याध्यापकासह दोन शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेत पोषण आहारासाठी मिळालेला तांदुळ व कडधान्य मुख्याध्यापकांनी विकले, अशी तक्रार गावकºयांनी गटशिक्षणाधिकारी मंगरुळपीर, जि.प. शिक्षणाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. शाळेचे मुख्याध्यापक व शाळा समिती उपाध्यक्ष नरेंद्र भोपत मिसाळ यांनी संगनमत करुण शालेय पोषण आहाराचे तांदूळ आणि कडधान्य मिळून अंदाजे सात हजार रुपये किमतीचे धान्य नरेंद्र भोपत मिसाळ उपाध्यक्ष यांच्या मालकीच्या आॅटोरिक्षात नेऊन मंगरुळपीर येथे विकल्याचे या तक्रारीत त्यांनी नमूद केले होते. या संदर्भात लोकमतने २२ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करून शिक्षण विभागाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन मंगरुळपीर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी करून जिल्हास्तरावर अहवाल पाठविला आहे; परंतु आता १८ दिवस उलटले तरी, या प्रकरणी कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाचा केवळ चौकशीचा फार्स तर नव्हता ना, अशी शंका निर्माण होत आहे.
मोहरी येथील पोषण आहाराचे धान्य विकल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यात शाळेत पुरवठा करण्यात आलेल्या पोषण आहाराच्या धान्यात तफावत आढळून आली. या संदर्भातील अहवाल जिल्हास्तरावर पाठविण्यात आला आहे.
- श्रीकांत माने
शिक्षण विस्तार अधिकारी
पं.स. मंगरुळपीर