वाशिम जिल्ह्यात नाफेड’च्या सोयाबिन खरेदीची प्रक्रिया मंदावली : अडीच महिन्यात केवळ चार हजार क्विंटल खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 03:58 PM2017-12-19T15:58:35+5:302017-12-19T15:59:21+5:30
वाशिम: जिल्ह्यात ५ आॅक्टोबर २०१७ पासून सोयाबिन, मूग, उडिद या शेतमालाची ‘नाफेड’मार्फत आॅनलाईन नोंदणी करून खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, हमीदरानुसार सुरू असलेल्या या खरेदीला शेतकºयांकडून विशेष प्रतिसाद मिळेनासा झाला आहे.
वाशिम: जिल्ह्यात ५ आॅक्टोबर २०१७ पासून सोयाबिन, मूग, उडिद या शेतमालाची ‘नाफेड’मार्फत आॅनलाईन नोंदणी करून खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, हमीदरानुसार सुरू असलेल्या या खरेदीला शेतकºयांकडून विशेष प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. त्यामुळेच गेल्या अडीच महिन्याच्या कालावधीत ‘नाफेड’च्या जिल्ह्यातील सहा केंद्रांवर केवळ ४ हजार २४० क्विंटल सोयाबिनची खरेदी झाली आहे. जेव्हा की, एकट्या वाशिम बाजार समितीत एवढ्या सोयाबिनची दैनंदिन खरेदी होते. यावरून शेतकºयांचा कल आजही व्यापाºयांकडेच अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.
५ आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, रिसोड, कारंजा, मालेगाव आणि मानोरा या सहा ठिकाणी ‘नाफेड’ने खरेदी केंद्र सुरू करून सोयाबिन, मूग आणि उडिद या शेतमालाची खरेदी सुरू केली. प्रत्यक्षात मात्र सोयाबिन आणि मूग उत्पादक शेतकºयांनी या खरेदी केंद्रांकडे सपशेल पाठ फिरवली असून अडीच महिन्यात ४ हजार २४० क्विंटल सोयाबिन आणि ९३८ क्विंटल मूग खरेदी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली.
उडिदाची विक्रमी खरेदी!
वाशिम जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या सहा खरेदी केंद्रांकडे सोयाबिन आणि मूग उत्पादक शेतकºयांनी पाठ फिरवली असली तरी उडिद उत्पादक शेतकºयांनी मात्र व्यापाºयांऐवजी आपला माल ‘नाफेड’कडे विकणे पसंत केले आहे. त्यामुळेच गेल्या अडीच महिन्यात सहा केंद्रांवर उडिद खरेदीने ४४ हजार ६३८ क्विंटलचा मोठा पल्ला गाठला आहे.
कापूस खरेदी अद्याप निरंकच!
सोयाबिन, मूग आणि उडिद या शेतमालाच्या खरेदी केंद्रानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या केंद्रांवर कापसाची खरेदीही सुरू करण्यात आली आहे. मात्र, या केंद्रांकडे जिल्ह्यातील कापूस उत्पादकांनी दुर्लक्ष केले असून खरेदी केंद्र सुरू झाले तेव्हापासून आजतागायत एक बोंड देखील कापूस खरेदी झालेला नाही.