..अन् अधिका-यांना अर्धवटच सोडावा लागला कार्यक्रम

By admin | Published: October 14, 2015 12:36 AM2015-10-14T00:36:55+5:302015-10-14T00:36:55+5:30

दुष्काळी परिस्थितीवरील कार्यशाळेत शेतक-यांनी अधिका-यांना धरले धारेवर; बुलडाणा जिल्ह्यातील घटना.

..The program was partially abandoned by the officials | ..अन् अधिका-यांना अर्धवटच सोडावा लागला कार्यक्रम

..अन् अधिका-यांना अर्धवटच सोडावा लागला कार्यक्रम

Next

माटरगाव (जि. बुलडाणा): : दुष्काळी परिस्थितीमुळे होत असणार्‍या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शनपर कार्यक्रम येथे ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र शेतकर्‍यांसाठी हा कार्यक्रम 'उपाशीपोटी रामायण' ठरल्याने उपाययोजना नसल्याचा तसेच समस्या न सुटल्याचा आरोप करीत अधिकार्‍यांनाच धारेवर धरले त्यामुळे अधिकार्‍यांना कार्यक्रम अर्धवटच सोडून परतीच्या मार्गावर लागावे लागले. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. याला आळा घालण्यासाठी शेतकर्‍यांचे मनोबल वाढविण्याच्या अनुषंगाने येथे ११ ऑक्टोबर रोजी आठवडी बाजार परिसरात संध्याकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून अपर जिल्हाधिकारी टाकसाळ, उपजिल्हाधिकारी घेवंदे, तहसीलदार पवार यांचेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे आदी उपस्थित होते. सरपंच वैशाली ठाकरे, उपसरपंच देशमुख, पो.पा. दिलीप देशमुख यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान शेतकर्‍यांनी दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना होत नसल्याचा तसेच पाणी, वीज आदी समस्यांबाबत अधिकार्‍यांकडे प्रश्न मांडले. मात्र त्यावर तोडगा न निघाल्याने तसेच शेतकरी सामान्य जीवन जगत असतानाही अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना महागडे मोबाईल वापरणे बंद करा, भौतिक सुखावरील खर्च टाळा असे उपदेश केल्याने शेतकरी संतप्त झाले व इतरांची जीवन जगण्याची पध्दत व शेतकर्‍यांचे जीवन यावरील तफावत सांगून संताप व्यक्त केला. अखेर तापलेले वातावरण पाहता अधिकार्‍यांनी कार्यक्रम अध्र्यावर संपवून काढता पाय घेतला. एकूणच येथील कार्यक्रम म्हणजे शेतकर्‍यांना उपाशीपोटी रामायण ऐकविण्याचा झाला, अशी चर्चा शेतकर्‍यांमध्ये व्यक्त होत आहे. तसेच आधी शेतकर्‍यांच्या वर्षानुवर्षाच्या असलेल्या समस्या दूर कराव्या, म्हणजेच शेतकर्‍यांचे मनोबल वाढून स्वावलंबी होईल, असे मत सुध्दा शेतकर्‍यांनी यावेळी व्यक्त केले.

Web Title: ..The program was partially abandoned by the officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.