शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 04:17 PM2019-12-16T16:17:22+5:302019-12-16T16:18:49+5:30
आता पदोन्नती प्रक्रियादेखील लांबणीवर पडत असल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हयातील ७४ शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती देण्यासाठी बिंदु नामावलीची प्रक्रिया राबविण्यात आली. परंतू, यामध्ये वरिष्ठांनी त्रूटी काढल्याने त्रूटीची पुर्तता करण्याकामी शिक्षण विभाग कामाला लागला आहे. तुर्तास पदोन्नती प्रक्रिया रखडल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७३ प्राथमिक शाळा असून, या शाळेवर तीन हजारापेक्षा अधिक शिक्षक कार्यरत आहेत. दर महिन्याला अनियमित वेतन, जीपीएफ पावत्यांचा हिशेब विहित मुदतीत न मिळणे, वैद्यकीय देयकांचा प्रश्न प्रलंबित आदींमुळे अगोदरच शिक्षक हैराण असताना आता पदोन्नती प्रक्रियादेखील लांबणीवर पडत असल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. ज्येष्ठ शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यासाठी गत वर्षभरापासून प्रशासकीय कार्यवाही केली जात आहे. बिंदु नामावली पूर्ण झाल्यानंतर जवळपास ७४ शिक्षक हे मु्ख्याध्यापक पदावरील पदोन्नतीसाठी पात्र ठरलेले आहेत. आज ना उद्या पदोन्नती मिळेल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या या शिक्षकांना तीन महिन्यानंतरही पदोन्नती मिळाली नाही. शिक्षण विभागाने बिंदुनामावलीचा प्रस्ताव अमरावती येथील समाजकल्याणच्या विभागीय कार्यालयाकडे पाठविल्यानंतर यामध्ये त्रूटी काढण्यात आल्या. त्रूटींची पुर्तता झाली नसल्याने पदोन्नती प्रक्रियादेखील रखडली आहे. ७४ शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती केव्हा मिळणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
त्रूटींची पुर्तता लवकरच - अंबादास मानकर
जिल्ह्यातील ७४ शिक्षक मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीसाठी पात्र ठरले आहेत. प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून बिंदु नामावलीचे प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. तेथे काही त्रूटी काढण्यात आल्या. त्यामुळे सदर प्रस्ताव परत आले. या प्रस्तावातील त्रूटींची पुर्तता करण्यासाठी वाशिम येथे विशेष शिबिर घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे. त्यानंतर परिपूर्ण प्रस्ताव पाठविले जातील. पदोन्नतीची प्रक्रिया लवकरात लवकर निकाली काढली जाईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी दिली.
शिक्षकांचे प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षक समितीच्यावतीने नेहमीच शिक्षण विभागाशी चर्चा करून पाठपुरावा केला जातो. मुख्याध्यापक पदासाठी जिल्ह्यातील ७४ शिक्षक पात्र असल्याने या शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर निकाली काढावी, यासंदर्भात प्राथमिम शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. बिंदु नामावलीतील त्रूटींची पुर्तता करून तातडीने प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवावा, अशी मागणी आम्ही केली आहे, असे शिक्षक समितीचे (अमरावती विभाग)सरचिटणीस सतीश सांगळे यांनी सांगितले.