विभागीय परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला पदोन्नती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 11:48 AM2021-06-02T11:48:14+5:302021-06-02T11:48:35+5:30

Washim ZP News : काही विशिष्ट अटींवर ही पदोन्नती दिल्याची विश्वसनीय माहिती असून, याबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे.

Promotion to Zilla Parishad employees who do not pass the divisional examination? | विभागीय परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला पदोन्नती?

विभागीय परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला पदोन्नती?

googlenewsNext

- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात एका कर्मचाऱ्याला विभागांतर्गतची (डिपार्टमेंटल) परीक्षा उत्तीर्ण न करतानाच पदोन्नती दिल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. काही विशिष्ट अटींवर ही पदोन्नती दिल्याची विश्वसनीय माहिती असून, याबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे.
शासकीय सेवेचा विशिष्ट कालावधी पूर्ण करणे आणि जिल्हा सेवा प्रवेशोत्तर (डिपार्टमेंटल) परीक्षा चार वर्षात तीन संधींमध्ये उत्तीर्ण करणाऱ्या जि.प. कर्मचाऱ्याला पदोन्नतीचा लाभ दिला जातो. शक्यतोवर सप्टेंबर महिन्यात पदोन्नती करण्यात यावी, असे नियमानुसार अपेक्षित आहे.  मार्च २०२१ मध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील काही कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला. तत्पूर्वी बांधकाम विभाग, पदोन्नती समिती, सामान्य प्रशासन विभाग आदी विभागातून पदोन्नतीच्या या फाइलचा यशस्वी प्रवास झाला. 
सर्व प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर, बांधकाम विभागाचे तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता सुरेश औतकर यांच्या कार्यकाळात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या या पदोन्नती प्रक्रियेतील काही किस्से आता समोर येत आहेत. काही अटी, शर्तीवर एका कर्मचाऱ्याला विभागांतर्गतची परीक्षा उत्तीर्ण न करताच पदोन्नती दिल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे.  मात्र, याबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात असल्याने कुठेतरी पाणी तर मुरत नाही ना, अशी चर्चाही रंगत आहे. दरम्यान, शक्यतोवर सप्टेंबर महिन्यात पदोन्नतीचे प्रकरण निकाली काढणे अपेक्षित असते. 
मार्च २०२१ या महिन्यात जिल्हा परिषदेचे अन्य विभागवगळता बांधकाम विभागात पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली. तत्कालीन कार्यकारी अभियंता औतकर              यांनी ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होण्यापूर्वी पदोन्नतीची फाइल निकाली काढली, हे विशेष.

 

माझ्याकडे जलसंधारण विभागाचा प्रभार असून बांधकाम विभागातील पदोन्नती प्रक्रियेविषयी मला काही माहिती नाही. मी बांधकाम विभागाचा प्रभार घेण्यापूर्वीचे पदोन्नतीचे हे प्रकरण आहे. तरी याबाबत सविस्तर माहिती घेतली जाईल. 
- ए.एम. खान
प्रभारी कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग
जिल्हा परिषद वाशिम.


पदोन्नती समितीत पाच जणांचा समावेश असतो. पदोन्नतीबाबतचा निर्णय हा पदोन्नती समितीतील सदस्य घेत असतात. सर्व बाबींची पडताळणी केल्यानंतर पदोन्नती दिली जाते. बांधकाम विभागातील पदोन्नतीबाबत सविस्तर माहिती घेतल्यानंतर नेमके काय प्रकरण आहे, ते सांगता येईल.
- विवेक बोंद्रे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
सामान्य प्रशासन, जि. प. वाशिम.


जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रियेविषयी संबंधितांकडून माहिती घेतली जाईल. चौकशीअंती चुकीच्या पद्धतीने पदोन्नती झाल्याचे निदर्शनात आले तर याबाबत पुढील योग्य ती कार्यवाही शासन नियमानुसार करण्यात येईल.
- वसुमना पंत
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद वाशिम.

Web Title: Promotion to Zilla Parishad employees who do not pass the divisional examination?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.