अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:28 AM2021-07-20T04:28:07+5:302021-07-20T04:28:07+5:30

वाशिम : खासगी कंपन्यांचे बियाणे उगविले नसल्याची तक्रार घेऊन शेतकरी पोलीस ठाण्यात आल्यास त्यांची तक्रार नोंदवून घ्यावी अशा सूचना ...

Promptly complete the crop damage due to excessive rainfall | अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

Next

वाशिम : खासगी कंपन्यांचे बियाणे उगविले नसल्याची तक्रार घेऊन शेतकरी पोलीस ठाण्यात आल्यास त्यांची तक्रार नोंदवून घ्यावी अशा सूचना देतानाच, अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महसूल व कृषी विभागाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात १९ जुलैला खरीप पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार किरणराव सरनाईक, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्यासह विभागप्रमुखांची उपस्थिती होती.

खरीप हंगामाची १०० टक्के पेरणी झाली असून, पावसामुळे पिकांची परिस्थिती सध्या चांगली आहे. यंदा बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. तरीही शेतकऱ्यांनी खासगी कंपनीकडून घेतलेले बियाणे उगविले नसल्यास संबंधित शेतकरी खासगी कंपनीविरुद्ध तक्रार दाखल करण्यास पोलीस ठाण्यात आल्यास त्याची तक्रार नोंदवून घ्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. जिल्ह्यातील ४ महसूल मंडळातील १५ गावांमध्ये अतिवृष्टी झाली असून, पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले. आतापर्यंत ७५ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहे. उर्वरित पंचनामे पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल त्वरित शासनाला सादर केला जाईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले.

००००००००००

८० टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप

जिल्ह्यात आतापर्यंत ८३ हजार ४६९ शेतकऱ्यांना ६८६ कोटी १५ लाख रुपये पीक कर्ज वितरण झाले आहे. सुमारे ८० टक्के पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले आहे. गतवर्षी १५ जुलैपर्यंत ७२ हजार २० शेतकऱ्यांना सुमारे ५१६ कोटी ७७ लाख रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. खासदार गवळी म्हणाल्या, शेतकऱ्यांना बँकांकडून वेळेवर पीक कर्ज उपलब्ध होणे आवश्यक असून, आगामी खरीप हंगामात मे अखेरपर्यंत जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होईल, यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना दिल्या.

००००००००००००००

बियाण्यांच्या दरात मोठी तफावत

आमदार पाटणी म्हणाले, महाबीज व खासगी कंपन्यांच्या बियाण्याच्या दरात मोठी तफावत आहे. त्यामुळे जिल्ह्यात महाबीजचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे. याकरिता कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करून आवश्यक कार्यवाही करावी, तसेच पीक कर्ज वितरणात राष्ट्रीयीकृत बँकांकडून दिरंगाई होत असल्याचे त्यांनी सांगितले.

०००००००००००००

Web Title: Promptly complete the crop damage due to excessive rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.