वाशिम जिल्ह्यातील निर्वासितांच्या मालमत्ता होणार निर्बंधमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 02:14 PM2019-08-10T14:14:17+5:302019-08-10T14:14:56+5:30
या सर्व मालमत्तांचा धारणाधिकार अ-१ धारणा प्रकार अथवा भोगवटादार वर्ग-१ करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या निर्वासित नागरिकांच्या वसाहती वाशिम व कारंजा लाड येथे उभारण्यात आल्या होत्या. या निर्वासितांना निवासी व वाणिज्य प्रयोजनार्थ देण्यात आलेल्या मालमत्ता निर्बंधमुक्त होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
फाळणीच्या वेळी पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींनी भारतात सोडलेली मालमत्ता आणि राज्य व केंद्र शासनाने त्यात घातलेली भर यातून मालमत्तांचा भरपाई संकोष तयार करण्यात आला. या भरपाई संकोषामधून १९५४ च्या निर्वासित इसम नुकसान भरपाई व पुनर्वसन अधिनियमाच्या आधारे निर्वासितांना मालकी हक्काने मालमत्ता वितरीत करण्यात आल्या. कोणत्याही अटी, शर्ती अथवा करारनाम्याशिवाय निवासी व वाणिज्य प्रयोजनार्थ या मालमत्ता वितरीत करण्यात आल्या असल्याने या सर्व मालमत्तांचा धारणाधिकार अ-१ धारणा प्रकार अथवा भोगवटादार वर्ग-१ करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मालमत्तांचा धारणाधिकार अ-१ धारणा प्रकार अथवा भोगवटादार वर्ग-१ केल्यामुळे या मालमत्ता हस्तांतरणावरील निर्बंधातून मुक्त होणार आहेत. भरपाई संकोषातून अशा मालमत्ता मिळालेल्या व्यक्तींनी संबंधित उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्याकडे सर्व कागदपत्रांसह १६ आॅगस्ट २०१९ पूर्वी उपस्थित राहावे. या कार्यवाहीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. नियमानुसार कागदपत्रे प्राप्त झाल्यास २५ आॅगस्ट २०१९ पर्यंत विशेष मोहीम राबवून सर्व प्रकारणे निकाली काढण्यात येतील, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले.