‘एसटी’ संबंधित तक्रारीसाठी ५०० रुपये शुल्काचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 03:04 PM2018-09-02T15:04:29+5:302018-09-02T15:05:52+5:30
तक्रारींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ५०० रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव महामंडळाकडे सादर करण्यात आला आहे.
लोेकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: चालक किवा वाहकांकडून होणारा नियमांचा भग, तसेच प्रवाशांना येणाºया विविध अडचणींबाबत राज्य परिवहन महामंडळाकडे (एसटी) असंख्य तक्रारी येतात. यातील बहुतांश तक्रारी निरर्थक असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. अशा तक्रारींच्या चौकशीत उगाच वेळ खर्च होतो. त्यामुळे तक्रारींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ५०० रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव महामंडळाकडे सादर करण्यात आला आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेºया अनियमित असणे, तिकिटासाठी वाहकांकडून प्रवाशांसोबत वाद होणे, नियोजित थांब्यावर बस न थांबविणे, सवलतीच्या तिकिटास नकार देणे, तसेच अकारण कोठेही बस थांबविणे, आदि प्रकारांबाबत प्रवासी एसटी महामंडळाचे आगारप्रमुख अथवा विभागीय नियंत्रकांकडेही तक्रारी करीत असतात. प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि त्यांचे समाधान व्हावे म्हणून एसटी महामंडळाचे संबंधित अधिकारी अशा तक्रारींची चौकशीही करतात. तथापि, चौकशी केल्यानंतर बहुतांश तक्रारी खोट्या असल्याचे आढळून येते. त्यामुळे एसटी महामंडळाच्या अधिकाºयांचा आणि संबंधित वाहक, चालकाचाही यामुळे अनावश्यक वेळ खर्च होतो. ही बाब टाळण्यासाठी एसटी महामंडळाकडे तक्रारीसाठी ५०० रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार प्रवाशाला तक्रार करताना ५०० रुपये रक्कम रितसर भरायची आहे. शुल्क भरले, तरच तक्रार ग्राह्य धरून चौकशी करण्यात येईल आणि या चौकशीत तथ्य आढळले नाही, तर प्रवाशाची रक्कम परत मिळू शकणार नाही. तथापि, असा कुठला प्रस्ताव मंजूर झाला नसल्याचे मंगरुळपीर आगार प्रमुख अकिल मिर्झा यांच्याकडून कळले आहे.