२९ कैद्यांच्या सुटकेसाठी न्यायालयात प्रस्ताव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:36 AM2021-05-22T04:36:53+5:302021-05-22T04:36:53+5:30

वाशिम : कोरोना विषाणू संसर्ग संकटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून कारागृहात साध्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना काही काळासाठी ...

Proposal filed in court for release of 29 prisoners | २९ कैद्यांच्या सुटकेसाठी न्यायालयात प्रस्ताव दाखल

२९ कैद्यांच्या सुटकेसाठी न्यायालयात प्रस्ताव दाखल

Next

वाशिम : कोरोना विषाणू संसर्ग संकटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून कारागृहात साध्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना काही काळासाठी घरी सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुषंगाने स्थानिक जिल्हा कारागृहात विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या २०० कैद्यांपैकी २९ कैद्यांच्या सुटकेसाठीचे अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा कारागृह अधीक्षक सोमनाथ पाडुळे यांनी शुक्रवारी दिली.

कोरोना संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. वाशिमच्या जिल्हा कारागृहात सध्या एकूण २०० कैदी विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत आहेत. त्यापैकी ७० कैद्यांना तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र कारागृहात ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित १३० कैदी मुख्य कारागृहात आहेत. नव्याने कारागृहात दाखल होणाऱ्या कैद्यांना प्रारंभीचे १४ दिवस तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात येते. तसेच त्यांची ठरावीक दिवसांच्या अंतराने नियमित कोरोना चाचणी केली जाते.

दरम्यान, अहवाल निगेटिव्ह आलेल्या कैद्यांना मुख्य कारागृहात हलविण्यात येत असून, तेथेही पुन्हा संबंधितांना १४ दिवस इतर कैद्यांपासून वेगळे ठेवत २८ दिवसानंतर कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास जुन्या कैद्यांसोबत ठेवण्यात येत आहे. तसेच चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या कैद्यांना शासनाच्या अधिकृत कोविड केअर सेंटरमध्ये उपचाराकरिता रवाना केले जात आहेे. अत्यवस्थ असलेल्या कैद्यांना सरकारी रुग्णालयात उपचारार्थ ठेवण्यात येत असल्याची माहिती कारागृह अधीक्षक पाडुळे यांनी दिली.

Web Title: Proposal filed in court for release of 29 prisoners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.