‘नाफेड’च्या तूर खरेदीसाठी मुदतवाढीचा प्रस्ताव!
By admin | Published: February 28, 2017 01:41 AM2017-02-28T01:41:13+5:302017-02-28T01:41:13+5:30
केंद्र शासनाला पत्र; शेतक-यांना दिलासा!
दादाराव गायकवाड
वाशिम, दि. २७- जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकर्यांना आधार व्हावा, या उद्देशाने नाफेडच्या तूर खरेदीसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार नाफेडकडून सुरू असलेली तुरीची खरेदी १५ मार्चऐवजी १५ एप्रिलपर्यंंत सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती नाफेडसाठी तूर खरेदी करणार्या महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांनी शनिवारी दिली.
जिल्ह्यासह राज्यभरात काही ठिकाणी नाफेडची तूर खरेदी करण्यात येत आहे. विविध तांत्रिक अडचणींमुळे ही खरेदी संथ झाली असताना आता येत्या १५ मार्चनंतर ती बंदही करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्यांची बाजारात मोठय़ा प्रमाणात पिळवणूक होण्याची शक्यता आहे. नाफेडसाठी जिल्ह्यात विदर्भ मार्केटिंग फेडरेशन (व्हीसीएमएफ) च्यावतीने मंगरुळपीर येथे, तर महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (एमएससीएमएफ) च्यावतीने मालेगाव, कारंजा, वाशिम, अनसिंग या चार ठिकाणी तूर खरेदी सुरू करण्यात आली. त्यातील मालेगाव आणि अनसिंगसह कारंजा येथील खरेदी साठवणुकीच्या अडचणीपोटी बंद करण्यात आली, तर वाशिम येथे साठवणुकीच्या अडचणीमुळेच संथ गतीने खरेदी करण्यात येत आहे.
खरेदी केलेल्या तुरीच्या साठवणुकीसाठी ह्यएमएससीएमएफह्ण च्यावतीने नियोजन करण्यात येत आहे. यासाठी पणन महामंडळाच्या गोदामांसह स्वत:ची गोदामे वापरण्याची तयारी त्यांनी केली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळालाही सूचना देऊन साठवणुकीसाठी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. तथापि, नाफेडच्या खरेदीची मुदत ही १५ मार्च ठेवण्यात आली आहे. त्यातच साठवणुकीच्या अडथळय़ामुळे खरेदी बंद ठेवण्यात आल्याने अनेक शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. इतर शेतकर्यांना त्याचा फटका बसू नये म्हणून राज्य शासनाकडून नाफेडच्या खरेदीसाठी १५ एप्रिलपर्यंंंत मुदतवाढ मिळावी, यासाठी एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत त्यावर सकारात्मक निर्णय होणार असल्याचा विश्वास जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांनी वर्तविला आहे.
केवळ वाशिम जिल्हाच नव्हे, तर राज्यातील इतरही जिल्ह्यात नाफेडसाठी धान्य खरेदी सुरू आहे. येत्या १५ मार्चपर्यंंतच या खरेदीची मुदत ठरविण्यात आली आहे; परंतु शेतकर्यांच्या सोयीसाठी ही मुदत महिनाभरासाठी वाढविण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला आहे. मंगळवारपर्यंंंत यावर सकारात्मक निर्णय होण्याचा विश्वास आहे. मुदतवाढ मिळाल्यास साठवणूक व्यवस्था करून खरेदी सुरू ठेवण्यात येईल.
-एम. व्ही. बाजपेयी
जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाशिम