३५ वाहनांवर नोंदणी निलंबनाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:55 AM2021-02-27T04:55:42+5:302021-02-27T04:55:42+5:30
जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असताना खासगी प्रवासी बसेस, काळी-पिवळी टॅक्सी, ऑटोरिक्षा, खासगी प्रवासी वाहनांसह मालवाहू वाहने नियमांचे उल्लंघन करून ...
जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असताना खासगी प्रवासी बसेस, काळी-पिवळी टॅक्सी, ऑटोरिक्षा, खासगी प्रवासी वाहनांसह मालवाहू वाहने नियमांचे उल्लंघन करून क्षमतेपेक्षा अधिक आणि नियमबाह्य पद्धतीने प्रवासी वाहतूक करीत आहेत. अशा वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय वाशिमकडून अशा वाहनांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत शुक्रवार दि. २६ फेब्रुवारी रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने १७ ऑटोरिक्षा, १४ खासगी प्रवासी वाहने, ०३ दुचाकी आणि १ टेम्पो ट्रॅव्हलर अशा ३५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करतानाच त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत नोंदणी निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील जनतेने कोरोना संसर्गापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी खासगी प्रवासी बसेस, क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी टॅक्सी, परवाना नसलेल्या ऑटोरिक्षा, परवाना नसलेली खासगी प्रवासी वाहने, तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांत प्रवास करू नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
------ ------
कोट : वाहतूकदारांनी क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात प्रवाशांची वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक करू नये, नियमांचे उल्लंघन करताना आढळलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल.
-ज्ञानेश्वर हिरडे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम