कार्यालयातच स्वीकारणार जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव
By Admin | Published: October 22, 2016 02:26 AM2016-10-22T02:26:58+5:302016-10-22T02:26:58+5:30
तीनही ठिकाणी कर्मचा-यांची नियुक्ती; इच्छुकांना दिलासा.
वाशिम, दि. २१- नगर परिषद निवडणूक राखीव प्रवर्गातून लढविणार्या इच्छुक उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव त्या-त्या ठिकाणी स्वीकारले जाणार आहेत.
जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर व कारंजा नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत राखीव प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र अथवा पडताळणी समितीकडे सादर केलेल्या प्रस्तावाची पोच पावती जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव स्वीकारून त्यांना पोच पावती देण्यासाठी त्या-त्या नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश अकोला येथील अमरावती विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक दोनने निर्गमित केल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.
वाशिम नगर परिषदकरिता वाशिम तहसील कार्यालय येथे ए. बी. वेलकर, मंगरूळपीर नगर परिषदकरिता मंगरूळपीर तहसील कार्यालय येथे जी. जी. जाधव व कारंजा नगर परिषदकरिता कारंजा तहसील कार्यालय येथे एस. एम. चांदगुडे यांची जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव स्वीकारण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व कर्मचारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या कालावधीत म्हणजेच २४ ते २९ ऑक्टोबर २0१६ या कालावधीत नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित राहून पडताळणी प्रस्ताव स्वीकारून त्याची रीतसर पावती संबंधितांना देतील. जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज स्वीकारण्यासाठी नियुक्त कर्मचार्यांसाठी संबंधित तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचे व त्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी उपविभागीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकार्यांना दिले आहेत.