शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव धुळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 04:37 PM2020-07-31T16:37:46+5:302020-07-31T16:37:54+5:30
प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसत असल्याने शिक्षक संघटनांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शेकडो शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे (चटोपाध्याय वेतनश्रेणी) प्रस्ताव वाशिमसह अमरावती विभागातील जिल्ह्यांत अडीच वर्षापासून प्रलंबित आहेत. प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसत असल्याने शिक्षक संघटनांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या २९ जून २००२ च्या निर्णयान्वये प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी (१२ वर्षे) व निवड श्रेणी (२४ वर्षे) लागू केली होती. यासाठी जे शिक्षक पात्र होत असतील अशा शिक्षकांना २०१७ पासून नवीन स्वरुपात प्रशिक्षण देण्याचा निर्णय शासनाने २३ आॅक्टोबर २०१७ रोजी घेतला आणि पात्र होणाऱ्या शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेच्या संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जाहीर करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या. तथापि, हा शासन निर्णय रद्द करण्यात आला. त्यामुळे पात्र शिक्षकांना शासन निर्णयानुसार चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू होणे अपेक्षीत होते. यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने खबरदारी घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पात्र शिक्षकांच्या प्रस्तावांना अंतिम रूप देण्याची प्रक्रिया राबविण्याचे काम तातडीने पूर्ण करणे अपेक्षीत होते; परंतु अडीच वर्षापासून या प्रक्रियेंतर्गत शेकडो शिक्षक पात्र असतानाही शासन निर्णयानुसार निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. आजवर राज्यातील बुलडाणा, औरंगाबाद, जालना, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, नांदेड, परभणी, बीड, ठाणे, आणि जळगाव जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना या वेतनश्रेणीचा लाभ मिळाला तर वाशिम, अकोलासह उर्वरित जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांना या वेतश्रेणीची प्रतिक्षा कायम आहे.
वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणीच्या प्रस्तावाची छाननी वाशिम जिल्ह्यात सुरू आहे. प्रस्ताव छाननी झाल्यानंतर तातडीने वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणीचा प्रश्न निकाली काढला जाईल.
-अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जि.प. वाशिम