शिक्षकांच्या सन्मानासाठी तालुकास्तरावरून प्रस्ताव मागविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 01:38 PM2018-09-01T13:38:14+5:302018-09-01T13:39:14+5:30
वाशिम : शिक्षकांना प्रोत्साहन देणे, आदर्शवत कार्य करणाºया शिक्षकांच्या पाठिवर कौतुकाची थाप म्हणून यावर्षी प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शिक्षकांना प्रोत्साहन देणे, आदर्शवत कार्य करणाºया शिक्षकांच्या पाठिवर कौतुकाची थाप म्हणून यावर्षी प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. प्रत्येकी तालुक्यातून दोन याप्रमाणे एकूण १२ आदर्श शिक्षकांना शिक्षक दिनी ५ सप्टेंबरला जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने गौरविण्यात येणार आहे.
‘गुरू’ या शब्दात प्रचंड सामर्थ्य, प्रेरणास्त्रोत, आदर, कृतज्ञता दडली आहे. विद्यार्थ्यांना घडविण्यात शिक्षकांचे मोलाचे योगदान असते. विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करणारे, शाळेत नवोपक्रम राबविणारे, नवनवीन संकल्पना राबवून शैक्षणिक वातावरण प्रफुल्लित करणारे, हसतखेळत अध्ययन-अध्यापन, मोफत शिकवणी देणारे आदी विविध उपक्रम राबवून समाजात खºया अर्थाने आदर्शवत ठरणाºया शिक्षकांचा शिक्षकदिनी यथोचित सन्मान व्हावा, आदर्श शिक्षकांपासून इतरांनी प्रेरणा घ्यावी, आदी उद्देश डोळ्यासमोर ठेवून आदर्श शिक्षकांचा शिक्षकदिनी सत्कार केला जातो. जिल्हा परिषद स्तरावरही आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्याच्या स्पष्ट सूचना शासनाने दिलेल्या आहेत. तथापि गत दोन, तीन वर्षांपासून जिल्हा परिषद प्रशासनातर्फे शिक्षकदिनी आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्याचे सोयीस्कररित्या टाळण्यात आले होते. या प्रकाराबद्दल शिक्षकांमधून नाराजीचा सूरही उमटला होता. गत दोन, तीन वर्षाची पुनरावृत्ती टाळून आदर्शवत कार्य करणाºया शिक्षकांचा शिक्षकदिनी सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी पुढाकार घेतला असून, प्रत्येक तालुक्यातून आदर्श शिक्षक सन्मानासाठी प्रस्ताव मागविण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. प्रत्येक तालुक्यातून दोन शिक्षक याप्रमाणे सहा तालुक्यातून एकूण १२ आदर्श शिक्षकांना ५ सप्टेंबर रोजी सन्मानित केले जाणार आहे.