‘जनसुविधा, तिर्थक्षेत्र विकास’चे प्रस्ताव रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 02:04 PM2020-02-21T14:04:28+5:302020-02-21T14:04:34+5:30
मालेगाव येथे कायमस्वरुपी गटविकास अधिकारी नसल्याने विकासात्मक कामांना खीळ बसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : मालेगाव पंचायत समितींतर्गतचे जनसुविधा, तिर्थक्षेत्र विकास, दलित वस्ती, रोपवाटीकेचे प्रस्ताव रखडल्याने ग्राम पंचायतींमधून नाराजीचा सूर उमटला आहे. गत तीन वर्षांपासून मालेगाव येथे कायमस्वरुपी गटविकास अधिकारी नसल्याने विकासात्मक कामांना खीळ बसत आहे.
मालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाच्या संगीत खुर्चीचा खेळ अद्याप संपलेला नाही. गेल्या वर्षभरात ३ गटविकास अधिकारी बदलले असून अद्याप कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळाले नाहीत. एक वर्षीपूर्वी संदीप कोटकर यांच्याकडे प्रभार होता. त्यानंतर कायमस्वरूपी गटविकास अधिकारी म्हणून कुलदीप कांबळे रूजू झाले. परंतू, अल्पावधीतच त्यांची बदली झाली. त्यानंतर दोन ते तीन अधिकाऱ्यांकडे प्रभार देण्यात आला. एका महिन्यात तीन अधिकाऱ्यांकडे प्रभार सोपविण्यात आल्यानंतरही कुणी उत्सकुतेने प्रभार घेतला नाही. आता जिल्हा परिषद स्वच्छता मिशन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांच्याकडे मालेगाव गटविकास अधिकारी पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. वाशिम येथील स्वच्छता मिशन विभागाचा नियमित कारभार पाहून इस्कापे यांना मालेगाव येथील पंचायत समितीचा प्रभारही पाहावा लागत आहे. वाशिम येथून अप-डाऊन असल्याने पंचायत समितीच्या अन्य अधिकारी, कर्मचाºयांवर फारसा वचक बसत नाही. याचा विपरित परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत असून, जनसुविधा, दलित वस्ती, तांडा वस्ती, तिर्थक्षेत्र विकास, रोपवाटिका आदींचे प्रस्ताव रखडले आहेत. विविध योजनेंतर्गतच्या सिंचन विहिर, ग्रामीण भागातील घरकुल, शौचालय आदी कामेही रेंंगाळत आहेत. विकासात्मक कामांना चालना मिळावी याकरीता मालेगाव येथे कायमस्वरुपी गटविकास अधिकारी मिळणे आवश्यक ठरत आहे.
(शहर प्रतिनिधी)