वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करा; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कारंजात रास्ता रोको आंदोलन
By संदीप वानखेडे | Published: October 9, 2023 05:05 PM2023-10-09T17:05:13+5:302023-10-09T17:05:38+5:30
कारंजा बायपासवर वाहने रोखली
वाशिम : कारंजा आणि मानोरा तालुक्यामधील पिकांचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करणे, पीक नुकसानभरपाई देणे यांसह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी ९ ऑक्टोबर रोजी कारंजा येथील झाशी राणी चौक बायपास येथे समनक जनता पार्टीतर्फे तासभर रास्ता रोको आंदोलन केले.
वन्य प्राण्यांमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई त्वरित मिळावी, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांच्या जीवांचे व पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्याबाबत उपाययोजना कराव्या , शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी उपायोजना राबवावी आदी मागण्या करण्यात आल्या. सामाजिक वनीकरण, वन्यजीव संरक्षण विभाग व वनपरिक्षेत्राकडून जोपर्यंत वनपरिक्षेत्रात पक्के कुंपण होत नाही, तोपर्यंत प्राण्यांमुळे होणारी शेतकऱ्यांची जीवितहाणी तसेच नुकसानीची भरपाई सरसकट देण्यात यावी, अशीही मागणी केली.
कार्यकर्त्यांनी बायपास परिसरात रस्ता रोखून धरला आणि वनविभाग व शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे बायपास परिसरात असलेल्या सर्व रस्त्यांवर शेकडो वाहने थांबली होती. समनक जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड, राष्ट्रीय नेते प्रा. डॉ. अनिल राठोड, जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांच्या मार्गदर्शनात कारंजा-मानोरा विधानसभा अध्यक्ष प्रकाश बळीराम राठोड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) छत्रपती चव्हाण यांनी आंदोलनास भेट देऊन मागण्यांचे निवेदन स्विकारले आणि पूर्ततेसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.