'त्या' शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा, शिक्षकांचे काळी फित लावून आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 01:34 PM2022-09-30T13:34:00+5:302022-09-30T13:34:51+5:30
२० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध
वाशिम - २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची हालचाल शासन स्तरावरून जोरासोरात सुरू आहे. याविरोधात आक्रमक झालेल्या जिल्हाभरातील संबंधित शाळांच्या शिक्षकांनी आज, ३० सप्टेंबर रोजी काळी फित लावून आंदोलन केले. शासनाने असा अन्यायकारक निर्णय घेऊ नये, अशी मागणी यामाध्यमातून करण्यात आली.
शालेय शिक्षण विभागाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती मागविली आहे. यामुळे या शाळा बंद होणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. याविरोधात आवाज उठविण्यासाठी शाळा बचाव समितीने आक्रमक पवित्रा घेतला. सरकारी शाळा बंद करून मुलांचे शिक्षण बंद करण्याचा डाव राज्य शासन आखत असल्याचा आरोप करत २९ सप्टेंबर रोजी समिती सदस्यांसह शेकडो पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तसेच आज बंदच्या यादीत नाव असलेल्या संबंधित शाळांच्या शिक्षकांनी एल्गार पुकारत काळी फित लावून आंदोलन केले.
जिल्ह्यात ६ ते २० पटसंख्येच्या १३३ शाळा
जिल्ह्यात ६ ते २० पटसंख्या असलेल्या एकूण १३३ शाळा आहेत. त्यात कारंजा तालुक्यातील ३२, वाशिम २६, मानोरा २६, मंगरूळपीर २५, रिसोड १३ आणि मालेगाव तालुक्यातील ११ शाळांचा समावेश आहे.
१ ते ५ पटसंख्येच्या १८ शाळा
१ ते ५ पटसंख्या असलेल्या १८ शाळा जिल्ह्यात सुरू असून त्यात कारंजा तालुक्यात ५, वाशिम ३, मानोरा ४, मंगरूळपीर २, रिसोड २ आणि मालेगाव तालुक्यातील २ शाळांचा समावेश आहे.