वाशिम येथे ‘त्या ’ घटनेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 03:36 PM2018-10-05T15:36:46+5:302018-10-05T15:37:21+5:30
राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ वाशिमच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मुंबई विद्यापिठाने पदविच्या विद्यार्थ्यांसाठी तरुणींबाबत अश्लील उल्लेख असलेली कविता अभ्यासक्रमात समाविष्ठ केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून वाशिम येथे ५ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ वाशिमच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन केले.
मुंबई विद्यापिठाच्या बीए मराठीच्या पेपर सहा मध्ये महानगरीय जाणिवेचे साहित्य हा घटक अंतर्भूत असून, या घटकात एका विशिष्ट समाजाच्या तरूणींबाबत अश्लील उल्लेख असल्याने सामाजिक संघटना संतप्त झाल्या आहेत. मुंबई विद्यापिठांतर्गत अभ्यासक्रमाद्वारे मुलींची बदनामी करणाºया व त्याला जबाबदार अभ्यासक्रम निर्धारीत करणाºया यंत्रणेविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ वाशिमच्यावतीने शुक्रवारी करण्यात आली. एकिकडे लेक वाचवा, लेक शिकवा, महिला सक्षमीकरण असा नारा दिला जात आहे तर दुसरीकडे मुंबईसारख्या विद्यापिठाने तरुणींबाबत अश्लील उल्लेख असलेली कविता अभ्यासक्रमात समाविष्ठ करून तमाम युवती व महिलांचा एकप्रकारे अपमानच केला आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून वाशिम येथे धरणे आंदोलनाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ वाशिमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.