'त्या' गावांना तीन महिन्यांचे धान्य उपलब्ध करा, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांचे निर्देश
By दिनेश पठाडे | Published: May 2, 2023 06:38 PM2023-05-02T18:38:23+5:302023-05-02T18:39:31+5:30
सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार व निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे व इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
वाशिम : पावसाळ्याच्या दिवसांत संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात धान्य पुरवठा करताना या गावांना तीन महिन्याचे धान्य उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. २ मे रोजी मान्सूनपूर्व तयारीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार व निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे व इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
शन्मुगराजन म्हणाले, जलसंधारण विभागाच्या प्रकल्पाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागाने करावी, विजेला अटकाव करणारी यंत्र सुस्थितीत असावी, शहरी भागातील नाले सफाई त्वरित करावी, त्यामुळे शहरी भागातील वस्तीत पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचणार नाही, शहरी भागातील धोकादायक इमारती व झाडांची पाहणी करुन योग्य ती कार्यवाही करावी, पाटबंधारे व जलसंपदा विभागाने आपल्या प्रकल्पावर बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वीत करुन सूचना फलक लावावे, जलजन्य आजाराला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना कराव्यात, पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.यांनी बैठकीत दिले.
१५४ गावांना धोका पोहचतो
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्याच्या वेढयामुळे वाशिम तालुक्यातील उकळीपेन आणि रिसोड तालुक्यातील बाळखेड, पेनबोरी व चिचांबापेन आणि नाल्याला येणाऱ्या पुरामुळे मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा (खु) या गावाचा नेहमी संपर्क तुटतो. नदी व अतिवृष्टीमुळे १५४ गावे व वार्डांना धोका पोहचतो. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून शोध व बचाव पथकासाठी तालुकानिहाय उपलब्ध असलेल्या साहित्याची माहिती यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.