४७७६ मोलकरणींच्या रोटीची सोय; नोंदणी नसलेल्या मोलकरणींचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:40 AM2021-04-17T04:40:41+5:302021-04-17T04:40:41+5:30
वाशिम : राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा करताना राज्य सरकारने विविध घटकांसाठी पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये नोंदणी व नूतनीकरण ...
वाशिम : राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा करताना राज्य सरकारने विविध घटकांसाठी पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये नोंदणी व नूतनीकरण केलेल्या घरेलू कामगार अर्थात मोलकरींचादेखील समावेश असून, जिल्ह्यातील ४७७६ मोलकरणींना याचा लाभ मिळणार आहे. दुसरीकडे नोंदणी केलेल्या मोलकरणींना यापासून वंचित राहावे लागणार आहे.
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी निर्बंध कडक करण्यात आले होते. मात्र, कोेरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने १३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली. कोरोनामुळे अनेक मोलकरणींना काम मिळणे बंद झाले आहे. अनेकांनी घरात मोलकरणींना कामावर न येण्यास सांगितले आहे. आधीच अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या मोलकरणींवर कोरोनाच्या रूपाने आणखी एक संकट आले आहे. मिनी लॉकडाऊनमुळे गोरगरीब नागरिक, निराधार, मोलकरीण आदी घटकांसाठी राज्य शासनाने पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसार नोंदणी व नूतनीकरण केलेल्या मोलकरणींना याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात ३१ मार्च २०२१ पर्यंत ४७७६ मोलकरणींनी कामगार कार्यालयात नोंदणी व नूतनीकरण केले आहे. लाभ नेमका किती आणि कधी मिळणार, याकडे नोंदणीकृत मोलकरणींचे लक्ष लागून आहे.
०००
नोंदणी व नूतनीकरण पूर्ण
वाशिम जिल्ह्यात ४७७६ मोलकरणींनी मार्च २०२१ पूर्वी नोंदणी व नूतनीकरण केले आहे. याशिवाय नोंदणी न केलेल्या मोलकरणींची संख्या २०० ते ३०० च्या घरात असू शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. ज्या मोलकरणींनी नोंदणी व नूतनीकरण पूर्ण केले, त्यांचा शासनाच्या मदतीचा लाभ मिळणार आहे.
०००
कोट
कोरोनामुळे सर्वांचेच जगणे कठीण झाले आहे. शहरी व ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अनेक जण कामावर येऊ नका, असे सांगत आहेत. शासनाने मदत जाहीर केली; परंतु मदत केव्हा व किती मिळणार, हे स्पष्ट नाही. लवकरात लवकर मदत मिळावी.
- आशाबाई बांगर
००
कोरोनामुळे संचारबंदी असल्याने रोजगारही नाही. काम मिळणे बंद झाले आहे. आधीच अल्प मजुरी मिळते. त्यातच मिळणारे कामही बंद झाल्याने घराची चूल कशी पेटवावी, हा प्रश्न आहे. किमान अडीच हजार रुपये मदत द्यावी.
- संगीता कांबळे,
00
कोरोनाचा फटका मोलकरणींना बसला आहे. कोरोनाच्या भीतीने घरमालकांनी घरकामाला बोलावणे बंद केले आहे. त्यामुळे, मोठा पेच निर्माण झाला आहे. शासनाने नोंदणी व नूतनीकरणाची कोणतीही अट न ठेवता घरकाम करणाऱ्या सर्वच महिलांना सरसकट मदत द्यावी.
-सुमन तायडे
०००
वाशिम शहरात सर्वाधिक नोंदणी
घरेलू कामगार, मोलकरीण म्हणून वाशिम शहरातील सर्वाधिक महिलांनी नोंदणी केली आहे. जवळपास अडीच हजारांच्या वर नोंदणी झाली आहे. याशिवाय नोंदणी नसलेल्या घरेलू कामगारांची संख्या १०० च्या घरात जाऊ शकते. वाशिम शहरातही कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक मोलकरणींना सध्या कामावर येऊ नका, असे सांगितले जात आहे.