पं. समितीच्या मासिक सभेला गैरहजर ८ अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘शो-काॅज’
By संतोष वानखडे | Published: April 5, 2023 07:18 PM2023-04-05T19:18:57+5:302023-04-05T19:21:59+5:30
ग्रामीण भागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था प्रणालीत पंचायत समितीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे
वाशिम (संतोष वानखडे) : वाशिमपंचायत समितीच्या मासिक सभेला गैरहजर राहणाऱ्या ८ अधिकारी, कर्मचाऱ्यांना गटविकास अधिकारी के.एस. काळबांडे यांनी बुधवारी सायंकाळी कारणे दाखवा (शो काॅज) नोटीस बजावल्याने एकच खळबळ उडाली.
ग्रामीण भागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था प्रणालीत पंचायत समितीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंचायत समितीमध्ये ग्राम पंचायत व ग्रामस्थांच्या विविध समस्यांचे निराकरण केले जाते. शिक्षण, आरोग्य, पंचायत, कृषी, बांधकाम, पाणीपुरवठा यांसह विविध विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत योजना पोहचविल्या जातात. त्याअनुषंगाने पंचायत समिती स्तरावर मासिक सभा व इतरही सभा घेण्यात येतात. या सभेत महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होउन त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, वाशिम पंचायत समितीच्या मासिक सभेत गत काही महिन्यांपासून अधिकारी, कर्मचारी हजर राहत नसल्याचा प्रकार समोर आला. ३१ मार्चच्या मासिक सभेलादेखील अधिकारी, कर्मचारी गैरहजर असल्याचे पाहून उपसभापती गजानन गोटे यांनी आक्रमक पवित्रा घेत याप्रकरणाची वरिष्ठांकडे तक्रार केली. याची दखल घेत गटविकास अधिकारी काळबांडे यांनी आठ अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नाेटीस बजावून तीन दिवसांत लेखी खुलासा मागविला आहे.