पालकसभेतून गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 05:45 PM2018-12-14T17:45:49+5:302018-12-14T17:46:22+5:30
पालक सभेच्या माध्यमातून शाळांमध्ये गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) - तालुक्यात काही ठिकाणी गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेसंदर्भात सोशल मीडियावर गैरसमज पसरविले जात असल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. या पृष्ठभूमीवर पालक सभेच्या माध्यमातून शाळांमध्ये गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती केली जात आहे.
गोवर-रुबेला लसीकरण मोहीम ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी राबविली जात आहे. यापूर्वी देशातील जवळपास २२ राज्यांमध्ये ही यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. यावर्षी महाराष्ट्रात ही मोहिम राबविली जात असून, काही किरकोळ ठिकाणी घडलेल्या प्रकारांबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरसमज, अफवा पसरविल्या जात असल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. हा संभ्रम, गैरसमज दूर करण्यासाठी तालुक्यात पालकसभा घेतल्या जात आहेत. या पालकसभेतून गोवर, रुबेला लसीकरण पूर्णत: सुरक्षित असून, पालकांनी कोणत्याही अफवा, गैरसमज यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १.४४ लाखापेक्षा अधिक बालकांना लसीकरण करण्यात आले आहे. मालेगाव तालुक्यात दिवसेंदिवस या मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळत असून ग्रामीण भागातील काही पालकवर्ग सद्यस्थितीत सोशल मीडियावर पसरविण्यात आलेल्या अफवांवर विश्वास ठेवत असल्याने या अफवा दूर करण्यासाठी तालुक्यातील अनेक शाळांमध्ये जनजागृतीसंबंधी पालक सभा, शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदर पालक सभा आणि शिबिरांमध्ये आरोग्य विभागातील चमू व बालरोग तज्ज्ञांनी मार्गदर्शन करून या केवळ अफवा असल्याचे सांगून लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. गोवर व रूबेला लस ही पूर्णपणे सुरक्षित असून लस देताना काहींना खाज व थोडा ताप येतो. परंतु यामुळे कोणत्याही स्वरूपाचा धोका नाही, असे बालरोग तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
लसीकरणानंतर काही बालकांना ताप आल्याच्या तक्रारी नाकारता येत नाही. परंतु यामुळे कुठलाही धोका वा अपाय नाही. सदर लस बालकांसाठी सुरक्षित आहे.
- डॉ. संतोष बोरसे,
तालुका आरोग्य अधिकारी, मालेगाव