वाशिमच्या कलापथकाची पंढरपुर वारीत जनजागृती
By admin | Published: June 30, 2017 07:55 PM2017-06-30T19:55:52+5:302017-06-30T19:55:52+5:30
वाशिम - वाशिमच्या कलापथकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण होत आहे. प्रत्येक कार्यक्रमात स्वच्छतेबाबत नवा संदेश नव्या पध्दतीने देण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित स्वच्छता दिंडीत वाशिमच्या कलापथकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण होत आहे. प्रत्येक कार्यक्रमात स्वच्छतेबाबत नवा संदेश नव्या पध्दतीने देण्यात येत आहे.
लोक कलावंत सुशिलाबाई घुगे यांच्या ‘जयहरी जयहरी म्हणावं जोरातं...पांडुरंगाच्या भक्तानं शौचालय बांधावं घरात’ या गीताने स्वच्छतेचे महत्व पटवुन देण्यात येत आहे. या पथकातील बेबीताई कांबळे यांनी गायलेल्या गीतांना वारकरी भरभरुन दाद देत असून, ‘दिंडी मागं दिंडी कशी चालते जोरातं... अन स्वच्छता सांभाळा असं साकडं घालते..’ या गीतामार्फत स्वच्छतेचा आग्रह धरण्यात येत आहे. माजी जि.प. सदस्य केशव डाखोरे हे हलगी वाजवुन स्वच्छतेचा संदेश देत आहते. लोककलावंत विलास भालेराव, प्रज्ञानंद भगत, कविनंद गायकवाड, वामन वाणी आणि राजाराम ठाकरे हे या स्वच्छता दिंडीत सहभागी वारकऱ्यांचे प्रभावीपणे मनोरंजनातुन प्रबोधन करीत आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी वाशिम जि. प. मार्फत गावागावात नसलेल्या कुटुंबांच्या घरी कलावंत पाठवुन गृहभेटी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या मोहिमेदरम्यान आलेल्या अनुभवामुळे या कलावंतांचे सादरीकरण दमदार होत आहे. या स्वच्छता दिंडीत याचा चांगला परिणाम पहावयास मिळत आहे. राज्यस्तरावर वाशिम जि. प. चा ठसा उमटत आहे. वाशिम जि. प. च्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईस्तापे यांच्या मार्गदर्शनाखाली राम श्रृंगारे हे या स्वच्छता दिंडीत सहभागी झाले आहेत.