स्वच्छ सर्वेक्षणासाठी शाळा, महाविद्यालयांत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 02:14 PM2018-08-08T14:14:52+5:302018-08-08T14:16:36+5:30
जिल्हा स्वच्छता कक्षातर्फे ग्रामीण भागातील नागरिक तसेच शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये या मोहिमेची जनजागृती केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण मोहिम वाशिम जिल्हयात राबविण्यात येत आहे. जिल्हा स्वच्छता कक्षातर्फे ग्रामीण भागातील नागरिक तसेच शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये या मोहिमेची जनजागृती केली जात आहे.
भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने देशातील सर्व जिल्ह्यांचे स्वच्छतेबाबत गुणांकन ठरविण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक मानांकाच्या आधारे देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत राबविण्यात येत आहे. स्वच्छतेसंदर्भातील घटकांबाबत सदर सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यासाठी गुणांकन पद्धती केंद्र शासनाकडून निश्चित करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबतच्या घटकांचा समावेश करण्यात आला असून सर्वात जास्त गुण मिळवणाºया जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावरून २ आॅक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यातील १० ते १६ ग्रामपंचायतींची निवड ऐच्छिक पद्धतीने करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रार्थना स्थळे, यात्रास्थळे, बाजारतळ अशा विविध सार्वजनिक ठिकाणांची तपासणी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये करण्यात येणार आहे. तसेच ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-२०१८’ (एसएसजी-१८) या अॅपवर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) संदर्भात प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत. या प्रतिक्रियांची केंद्र सरकार स्तरावर घेतल्या जाणार आहे. त्यासाठी जिल्हयातील सर्व कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी, आदींनी या अॅपवर प्रतिक्रिया नोंदविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना , जिल्हा स्वच्छता कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी केले.