वृक्ष लागवडीविषयी चित्ररथाद्वारे जनजागृती
By admin | Published: June 15, 2017 01:51 AM2017-06-15T01:51:11+5:302017-06-15T01:51:11+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी : मोहिमेत सहभागी व्हा!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत राज्यात चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी वन विभागाने तयार केलेल्या चित्ररथाला १३ जून रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हिरवी झेंडी दाखविली.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, उपवनसंरक्षक वि. ग. माने, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, सहायक वन संरक्षक आर. बी. गवई, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी के. आर. राठोड, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कोपर्डे आदी उपस्थित होते.
वाशिम जिल्ह्याला ५ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या अनुषंगाने ५ लाख २२ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
या अभियानात जास्तीत जास्त लोकसहभाग वाढविण्यासाठी वन विभागाच्यावतीने चित्ररथ तयार करण्यात आला आहे. २५ जूनपर्यंत हा चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जाणार असून, यासोबत असलेल्या कलापथकाच्या माध्यमातून झाडांचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. तसेच वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहे.
वृक्ष लागवडीत सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींचा होणार सन्मान
५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत राज्यात चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभाग नोंदवून आपल्या आपल्या लोकसंख्येइतकी वृक्ष लागवड करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना स्वातंत्र्यदिनी सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.