कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू - आनंद चरखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 07:04 PM2020-09-19T19:04:28+5:302020-09-19T19:04:35+5:30
व्यापारी युवा मंडळाचे अध्यक्ष आनंद चरखा यांच्याशी शनिवारी साधलेला संवाद.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: कोरोनाबाधितांची संख्या वाशिम शहराप्रमाणेच जिल्ह्यातही झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वाशिम शहरात १६ ते २२ सप्टेंबरदरम्यान व्यापारी मंडळाने जनता कर्फ्यूची हाक दिली आहे. जनता कर्फ्यू, व्यापाºयांची भूमिका, आगामी काळातील संकल्प, रॅपिड अॅन्टिजन टेस्ट यासंदर्भात व्यापारी युवा मंडळाचे अध्यक्ष आनंद चरखा यांच्याशी शनिवारी साधलेला संवाद. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू पाळला जात असल्याचे ते म्हणाले.
जनता कर्फ्यूमुळे कोरोनाची साखळी तुटणार, असे आपणाला वाटते का?
वाशिम शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना बाजारपेठेत नागरिकांची गर्दीही होत होती. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक होण्याची शक्यता असल्याने शहरातील सर्व व्यापाºयांनी एकत्र येत जनता कर्फ्यूसंदर्भात दोन दिवस बैठक घेतली. सर्वांच्या सहमतीने व सहकार्यातून १६ ते २२ सप्टेंबरदरम्यान जनता कर्फ्यू पाळला जात आहे. १७ व १८ सप्टेंबर रोजीच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार या दोन दिवसात पूर्वीच्या दैनंदिन अहवालाच्या तुलनेत कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाल्याचे दिसून येते.
जनता कर्फ्यूदरम्यान काही दुकाने उघडी राहतात, याबाबत काय सांगाल?
जनता कर्फ्यूबाबत सर्वांनी दुकाने बंद ठेवावी, असे सर्वसंमतीने ठरले आहे. शहरात सकाळ व सायंकाळी व्यापारी मंडळाचे पदाधिकारी फिरून ज्यांची दुकाने उघडी दिसतात, त्यांना दुकान बंद करण्यासंदर्भात विनंती केली जाते.त्यानंतर दुकान बंद करण्यात येते. २२ सप्टेंबरपर्यंत सर्व व्यापाºयांनी संयम पाळून दुकाने बंद ठेवावी.
२२ सप्टेंबरनंतर व्यापारी मंडळाची पुढील भूमिका काय राहिल?
बाजारपेठेतील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न म्हणून २२ सप्टेंबरनंतर दुकाने सुरू ठेवण्याची वेळ कमी करता येईल का या अनुषंगाने दोन्ही व्यापारी मंडळातर्फे शहरातील सर्व व्यापाºयांशी चर्चा केली जाईल. सर्वांच्या संमतीने दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेसंदर्भात निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न राहिल.
रॅपिड अॅन्टिजन टेस्टबाबत आपली भूमिका काय राहिल?
कोरोनाचे वेळीच निदान व्हावे याकरीता कारंजा शहरात प्रशासनाने व्यापाºयांची रॅपिड अॅन्टिजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. वाशिम शहरात जिल्हा प्रशासनाने व्यापारी, व्यावसायिकांची रॅपिड अॅन्टिजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतलाच तर त्याला व्यापारी युवा मंडळाचे निश्चितच सकारात्मक सहकार्य राहिल, यात शंका नाही. कोरोनाबाबत प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वाशिम शहरात २२ सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू असून ग्रामीण भागातील नागरिकांनी २२ सप्टेंबरपर्यंत शहरातील बाजारपेठेत येणे टाळावे. व्यापाºयांनीदेखील आणखी संयम पाळून तीन दिवस दुकाने कडकडीत बंद ठेवावी. नागरिकांनीदेखील शहरात विनाकारण न फिरता, अत्यावश्यक काम नसेल तर घरातच राहून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ याप्रमाणे स्वत:बरोबरच इतरांचे आरोग्यही जपण्याचा प्रयत्न करावा.