रिसोड शहरात जनता कर्फ्यू; बाजारपेठ कडकडीत बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 12:16 PM2020-09-06T12:16:17+5:302020-09-06T12:16:28+5:30
पहिल्याच दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिसोड शहरात ५ सप्टेंबरपासून ‘जनता कफ्यू’ची हाक देण्यात आली. पहिल्याच दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. व्यापाऱ्यांसह नागरिकांचा उत्स्फुर्त ‘जनता कर्फ्यूू’ला प्रतिसाद लाभला.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रिसोडकरांची चिंताही वाढली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २०५० झाली आहे. रिसोड शहरासह ग्रामीण भागातही ३०० च्या वर कोरोनााबाधितांची संख्या गेली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी महासंघ व नगर परिषदेने पुढाकार घेत ५ सप्टेंबरपासून जनता कर्फ्यूची हाक दिली. या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत.
पहिल्याच दिवशी जनता कर्फ्यूला व्यापारी, नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली. रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट असून, आणखी चार दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. नागरिकांनी अत्यावश्यक गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन व्यापारी महासंघ तसेच रिसोड नगर परिषदेने केले.
सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन
रिसोड शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होत आहे. शहरातील बाजारपेठेत गर्दी होत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनता कर्फ्यूदरम्यान नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नेहमी मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन व्यापारी महासंघ व नगर परिषदेतर्फे करण्यात आले.