वाशिम जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे कर्करोगासंदर्भात जनजागृती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:55 PM2017-12-10T23:55:49+5:302017-12-10T23:57:39+5:30
वाशिम : मुख कर्करोगासंदर्भात आरोग्य विभागातर्फे जनजागृतीपर मोहिम हाती घेण्यात आली असून, सरकारी रुग्णांलयात तपासणी केली जात आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरूण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक शेलोकार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मुख कर्करोगासंदर्भात आरोग्य विभागातर्फे जनजागृतीपर मोहिम हाती घेण्यात आली असून, सरकारी रुग्णांलयात तपासणी केली जात आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरूण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक शेलोकार यांनी केले.
कर्करोग हा एक जीवघेणा आजार असून, वेळीच सतर्कता बाळगली तर या आजारापासून स्वत:ला कसे वाचविले जाऊ शकते, यासंदर्भात माहिती देण्यासाठी तसेच निदान व उपचारासाठी आरोग्य विभागातर्फे १ ते ३१ डिसेंबर या दरम्यान मुख कर्करोग विरोधी अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात सर्व शासकीय रुग्णालयांत जनजागृती व तपासणी मोहिम सुरू आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या सेवनाने मुख कर्करोग होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. देशात दरवर्षी तोंडाचा कर्करोग झालेले एक लाख रुग्ण आढळतात. यापैकी अनेकांचा मृत्यु वर्षभरात होतो, असा दावा आरोग्य विभागाने केला. मुख कर्करोगाची लक्षणे ३० ते ४० या वर्षादरम्यान दिसून येत असली तरी त्यांची सुरुवात तरुणपणात होते. मुख कर्करोग मुख्यत: तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होतो. मुख कर्करोग हा गाल, जिभ,टाळु, हिरड्या, जिभेखालील भाग अशा तोंडाच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय स्तरावर ३० वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील महिला आणि पुरुषांच्या तोंडाची तपासणी केली जात आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच जिल्ह्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचीदेखील तपासणी करण्यात आली. ३१ डिसेंबरपर्यंत जनजागृती व तपासणी मोहिम सुरू राहणार आहे.