‘मास्क’बाबत जनता उदासीन; सार्वजनिक ठिकाणावर मुक्तसंचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:56 AM2021-02-20T05:56:03+5:302021-02-20T05:56:03+5:30
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात १७ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश ...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात १७ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय हॉटेल, पानटपरी, चहाची टपरी, चौपाटी इत्यादी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले असून, या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याचे आढळून आल्यास स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. त्याचप्रमाणे नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यावसायिक, दुकानदार यांचेवर कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तथापि, जनता कोरोना संसर्गाबाबत अद्यापही गंभीर नसून, सार्वजनिक ठिकाणी अनेक नागरिक विनामास्क फिरत असल्याचे चित्र गुरुवारी विविध ठिकाणी पाहायला मिळाले.
---------
स्वराज्य संस्थांकडून कारवाईची मोहीम
जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होणार नाही याबाबत स्थानिक प्रशासन (नगरपरिषद/नगर पंचायत /ग्रामपंचायत) यांनी दक्षता घेऊन व आवश्यक पथकाचे गठन करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करून त्यांच्या स्तरावरून गर्दीस प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर गुुरुवारी विविध शहरांत नगरपालिकेच्या पथकाने फिरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केल्याचेही चित्र दिसून आले.
---------
आस्थापनांत विनामास्क ग्राहकांचा वावर
खासगी आस्थापना, दुकाने या ठिकाणी मास्क, फेस कव्हर असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्याचे, तसेच हॉटेलमध्येसुद्धा मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यासह याबाबत दर्शनी भागात बॅनर अथवा फलक लावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत; परंतु व्यावसायिकही याबाबत उदासीन असून, जिल्हाभरातील अनेक आस्थापनांत मास्क लावणे बंधनकारक असल्याचे फलक न लावल्याने विनामास्क ग्राहकांचा संचार पाहायला मिळाला.