काटेपूर्णा अभयारण्याच्या प्रवेशद्वारासाठी लोकप्रतिनिधींचाही पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 06:35 PM2018-05-15T18:35:22+5:302018-05-15T18:35:22+5:30
वाशिम: अकोला-वाशिम जिल्ह्यात असलेल्या काटेपूर्णा अभयारण्याला वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात वनोजा येथे प्रवेशद्वार देण्याच्या मागणीसाठी वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांच्यानंतर लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेतला आहे.
वाशिम: अकोला-वाशिम जिल्ह्यात असलेल्या काटेपूर्णा अभयारण्याला वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात वनोजा येथे प्रवेशद्वार देण्याच्या मागणीसाठी वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांच्यानंतर लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेतला आहे. जि.प. सदस्य शिवदास राऊत आणि पंचायत समिती सदस्या सीमा मनवर यांनी मुख्य वनसंरक्षकांना पत्र देऊन वनोजा येथे प्रवेशद्वाराची मागणी केली आहे.
वाशिम जि. प. सदस्य शिवदास राऊत आणि पं. स. सदस्य यांनी मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांच्या मागणीचा संदर्भ देताना मुख्य वनसंरक्षकांना दिलेल्या मागणीपत्रात असे नमूद केले आहे की, काटेपूर्णा अभयारण्य हे वाशिम-अकोला जिल्ह्यात येते.या अभयारण्याचा निम्म्याहून अधिक भाग वाशिम जिल्ह्यात येतो; परंतु वाशिम जिल्ह्यात या अभयारण्यासाठी प्रवेशद्वारच नाही. अकोला जिल्ह्यात मात्र दोन प्रवेशद्वार असून, त्यापैकी एक अकोला-मंगरुळपीर मार्गावरील वाघा येथे आहे. वाघा येथील प्रवेशद्वार वनोजा येथे स्थानांतरित करणे निसर्ग परिचय, वन्यजीव जनजागृती, तसेच महसूल उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोणातून उत्कृष्ट पाऊल ठरेल, शिवाय संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून घोडा, खेचर साधनांचा वापर केल्यास स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल. मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांनी केलेली ही मागणी पूर्णपणे लोकहिताची तद्वतच अभयारण्य विकासाच्या दृष्टीनेही योग्य आहे. या मागणीला आमचे समर्थन असून, आपण सदर मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.