सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 04:09 PM2020-07-19T16:09:51+5:302020-07-19T16:10:00+5:30
सार्वजनिक शौचालय अभियानांतर्गत अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती १५ सप्टेंबरपर्यंत केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या सार्वजनिक शौचालय अभियानांतर्गत अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती १५ सप्टेंबरपर्यंत केली जाणार आहे. याशिवाय अन्य कामेही केली जाणार आहेत. या अभियानात सर्व ग्रामपंचायतीनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने १६ जुलै रोजी केले.
ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र शासनाच्यावतीने सदर अभियान राबविले जात आहे. कोरोनामुळे अनेक लोक शहरी भागातून ग्रामीण भागात स्थलांतरीत झाले आहेत. त्यांना शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे उघड्यावर शौचास जावे लागते. परिणामी गावात दुर्गंधी पसरत असल्याने साथीचे आजार होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे सार्वजनिक शौचालय दुरूस्ती, शौचालय बांधकाम यासंदर्भात सदर अभियान राबविण्यात येत आहे.
ग्रामपंचायतींवर सोपविली जबाबदारी
स्थलांतरीत कुटुंबाला सामुदायिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपविली आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व लोकांनी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. त्यामुळे या अभियानात सर्व ग्रामपंचायतीनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.
१५ सप्टेंबरपर्यंत ही कामे अपेक्षीत
जुलैपासून ते १५ सप्टेंबर या कालावधीत सार्वजनिक शौचालय अभियानात गावातील नादुरुस्त शौचालय दुरुस्त करणे, पुर्वी व नविन बांधलेले सामुहिक शौचालयाची माहिती देणे, मंजुर झालेल्या शौचालयाचे बांधकाम पूर्ण करुन वापरात आणणे, आवश्यक असल्यास सार्वजनिक शौचालयाची मागणी करणे ही कामे या कालावधीत करणे अपेक्षीत आहे.